Vidhan Parishad Election Result: अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी !

Vidhan Parishad Election Result: विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २७४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून यामुळे कोणाचा पत्ता कात होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अशातच आता भाजप नेते व महायुती पुरस्कृत उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयी आघाडी घेतली आहे. विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची २३ मतं आवश्यक आहेत. टिळेकर यांनी पहिल्या पसंतीच्या २३ मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांचा विजय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
तर दुसरीकडे आता अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. राजेश विटेकर २३ आणि शिवाजी गर्जे २४ मत मिळाली आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका महायुतीतील पक्षांसाठी आगामी विधानसभा निवडणुकांचं गणित सेट करण्यासाठी महत्वाच्या असल्याचं मानलं जात आहे.
महायुतीने ११ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ५ उमेदवार तर शिंदे यांच्या शिवसेनेचे २ व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २ असे ९ उमेदवार रिंगणात आहेत.
‘हे’ उमेदवार आहेत रिंगणात :
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव
उद्धव ठाकरे गट : मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट : जयंत पाटील





