Vidhan Parishad Election : निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का? पटेलांचा ‘हा’ खंदा समर्थक सोडणार साथ
राज्यात आगामी विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक (Vidhan Parishad Election) जाहीर झाली असून, जागावाटपावरून महायुतीमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Vidhan Parishad Election : राज्यात आगामी विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक (Vidhan Parishad Election) जाहीर झाली असून, जागावाटपावरून महायुतीमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच भंडारा-गोंदिया मतदारसंघातून एक अत्यंत खळबळजनक राजकीय बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुनील फुंडे यांनी उमेदवारीसाठी थेट पक्षांतराची तयारी दर्शवली आहे. भारतीय जनता पक्ष जर आपल्याला विधान परिषदेची (Vidhan Parishad Election) उमेदवारी देणार असेल, तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून हातात कमळ घेण्यास तयार आहोत, असे जाहीर विधान सुनील फुंडे यांनी केले आहे.
अंतर्गत वादामुळे आधीच चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसह होणाऱ्या या विधान परिषद निवडणुकीत संधी मिळावी म्हणून राज्यभरातील महायुतीच्या अनेक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये महायुतीचे स्पष्ट बहुमत असल्याने उमेदवारांची (Vidhan Parishad Election) मोठी गर्दी दिसून येत आहे. जागावाटपाच्या चालू असलेल्या चर्चेत भाजप सर्वाधिक १२ जागा लढविण्यावर ठाम आहे, तर शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देण्याचे गणित आखले जात आहे. मात्र, शिवसेना सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागांवर ठाम असल्याने महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.
या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाची जागा प्रफुल पटेल यांचे खंदे समर्थक सुनील फुंडे यांच्यासाठी मागण्यात येत आहे. परंतु, भाजपने या जागेवर आपला पारंपरिक दावा ठोकला असून ही जागा मित्रपक्षाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल पटेल यांच्या नावापुढे ‘कार्याध्यक्ष’ पद न लावल्याने पटेल आधीच नाराज असल्याचे बोलले जाते. त्यातच आता त्यांच्या अत्यंत विश्वासू समर्थकासाठी हक्काची (Vidhan Parishad Election) जागा सुटत नसल्याने कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढला आहे. याच नाराजीतून सुनील फुंडे यांनी थेट भाजप प्रवेशाची तयारी दाखवून महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने या जागेवर विजयाची मोठी खात्री आहे. आपली भूमिका मांडताना सुनील फुंडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपने लढवली होती आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात उतरला होता.
आता मतदारांचा कौल पाहता विधान परिषदेसाठी आपल्याला संधी मिळावी, अशी थेट अपेक्षा त्यांनी प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. जर मतदारांची पसंती नसेल तर मला उमेदवारी देऊ नये, त्यासाठी गृह विभागामार्फत रीतसर सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आपल्याला महाविकास आघाडीच्याही काही मतदारांनी संपर्क केला असून ते भेटण्यास उत्सुक असल्याचा दावा फुंडे यांनी केला आहे. लवकरच आपले नेते प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा करून ‘जर-तर’चे हे राजकारण आपण संपवून टाकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जर भाजपने उमेदवारीची हमी दिली, तर आपण राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करू, या फुंडे यांच्या विधानामुळे भंडारा-गोंदियाच्या स्थानिक राजकारणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ माजला आहे.






