Video: ‘कुणीतरी येणार गं..’ गाण्यावर ‘अशी ही बनवाबनवी’चे कलाकार पुन्हा थिरकले; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Ashi Hi Banwa Banwi: मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतो. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट रुपेरी पाड्यावर आला होता. चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. आजही या चित्रपटातील डायलॉग सर्वांनाच वेड लावतात.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या पिढीने देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.
‘लिंबूचं मटण’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ’70 रुपये वारले’ असे या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. काही चित्रपट वारंवार पाहिले तरी त्यातली मजा कधीच कमी होत नाही, असाच काहीसा अनुभव ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट पाहताना येतो. या सिनेमातील गाणे देखील तितकीच लोकप्रिय आहेत.
तब्बल 35 वर्षांनंतर या चित्रपटातील काही कलाकार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी त्यांनी ‘कुणीतरी येणार गं…’ या गाण्यावर पुन्हा एकदा ठेका धरला. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी देखील याला पसंती देत आहेत. नुकतंच एका कार्यक्रमानिमित्त अभिनेता सचिन पिळगांवकर, त्यांची पत्नी सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे हे चौघं एकाच मंचावर उपस्थित होते.
View this post on Instagram
यावेळी त्यांनी ‘कुणीतरी येणार गं…’ या गाण्यावर एकत्र डान्स केला. निवेदिता यांच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘डोहाळे पुरवा..’ या कडव्याने व्हिडीओची सुरुवात होते. तेव्हा सुप्रिया पिळगांवकर या सचिन यांच्याकडे हावभाव करून डान्सची सुरुवात करतात. त्यानंतर सचिन पिळगांवकर ‘कुणीतरी येणार गं’वर ठेका धरतात. त्यांच्यापाठोपाठ सुप्रिया, निवेदिता आणि अश्विनी यासुद्धा नाचू लागतात.





