PUNHA SHIVAJI RAJE BHOSALE : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. या चित्रपटाचा उद्देश स्पष्ट आहे, हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहाता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे. दरम्यान, आज (दि. ६) आषाढी एकादशीच्या पावन दिवशी या सिनेमाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला!” असं याला कॅप्शन देण्यात आलं आहे. स्वतः महेश मांजरेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. सिद्धार्थने अलीकडील काळात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली आहे. चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत. चित्रपटाच्या आशयात महाराष्ट्रच कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न गेल्या काही दशकांपासूनही अनुत्तरितच आहेत.