राज्यमंत्री शिवतारे यांच्या “व्हिडीओ’ची तालुक्‍यात चर्चा

पुरंदरला पूर आल्याने साताऱ्याला आलो नाही…

नीरा – राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत साताऱ्यात यायला उशीर का झाला. या प्रश्‍नांचे उत्तर दिलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. माझा मतदार संघ असलेल्या पुरंदरमध्ये पूरस्थिती असल्याने आपणाला साताऱ्यात यायला उशीर झाला, असे विजय शिवतारे म्हणत आहेत. शिवतारे यांच्या या वाक्‍यावर आक्षेप घेत पुरंदरच्या नारिकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर केला आहे. मंत्री शिवतारे यांची ही थाप आता त्यांच्याच अंगलट आली असल्याने विरोधकही त्याचा वापर मोठ्या खुबीने करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावात पूर आला होता. मोठ्या प्रमाणात लोकांना या संकटाचा सामना करावा लागला. अनेकांची घरे पाण्याखाली गेली, कित्येकांचे संसार बुडाले. तेथील लोक शासकीय मदतीची आस लाऊन बसले होते. मात्र, प्रशासनाच्या संथ कारभारामुळे अनेकांना तातडीने मदत मिळत नव्हती. लोकांनी पुढे होऊन पूरग्रस्तांना मदत करायला सुरवात केली. राज्याच्या अनेक भागातून मदत तसेच बचावकार्य सुरू झाले. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री असलेले विजय शिवतारे पहिले चार दिवस या भागात फिरकलेच नाही.

लोकांमध्ये शिवतारे यांच्या या वागण्याबद्दल मोठी चिड निर्माण झाली होती. आणि अखेर येथील स्थानिक वृत्तपात्रांनी शिवतारे यांना त्यांची जागा दाखवत टीकास्र सोडले. त्यानंतर मंत्री शिवतारे साताऱ्यामध्ये दाखल झाले, त्यांच्या या दिरंगाई बाबत त्यांच्यावर माध्यमांनी प्रश्‍नांची झोड उठवली. मात्र, हजरजबाबी असलेल्या शिवतारे यांनी मात्र लगेचच उत्तर दिले की, माझा मतदार संघ असलेल्या पुरंदरमध्ये पूरस्थिती असल्याने व तिथे लोक पुरात वाहून गेल्याने मदतीसाठी थांबावे लागल्याचे शिवतारे यांनी सांगितले. मात्र, शिवतारे यांच्या या वाक्‍यावरून शिवतारे थापा मारीत असल्याचा आरोप पुरंदरकरांनी केला आहे, त्यासाठी या व्हिडीओमध्ये “मारली थाप’ असा मथळा देत शिवतारे यांचा खोटारडेपणा अधोरेखित केला आहे.

पुरंदर तालुक्‍यात वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे नीरा या गावात काही घरे पाण्याखाली गेली होती. त्यांना ग्रामपंचायत व महसूल विभागाने वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर दि. 5 ऑगस्टला कऱ्हा नदीत एका महिला धुणे धुण्यासाठी गेल्या असता पाय घसरून वाहून गेल्या होत्या, त्यांनाही प्रशासनाने तातडीने मदत केली आहे. मात्र, या प्रक्रियेत राज्यमंत्री विजय शिवतारे कोठेही दिसले नाहीत. पूर ओसरल्यानंतर शनिवारी (दि.10) रात्री अकरा वाजता शिवतारे यांनी नीरा येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. मग शिवतारे यांनी पुरंदर मधील कोणत्या पूरग्रस्तांना मदत केली, असा सवाल आता पुरंदर मधील जनता करीत आहे. यामुळे विजय शिवतारे थापा मारतायत, असे “त्या’ व्हिडिओ म्हधून अधोरेखित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुरंदर तालुक्‍यात सध्या या शिवतारे यांच्या व्हिडीओचीच जोरदार चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)