Video : मुलांना मांडीवर घेतलं, पाळणा धरून ठेवला…; नर्सच्या धाडसामुळे वाचले चिमुरड्यांचे प्राण, भूकंपाचा थरारक व्हिडिओ पाहा

Earthquake | Hospital | Myanmar : म्यानमारची राजधानी नेपितॉ याठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या महाभयानक भूकंपानंतर, शनिवारीही अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडाले याठिकाणीही ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे आता म्यानमारमध्ये भूकंपामुळे मृतांचा आकडा १६०० पेक्षा जास्त झाला. मात्र, बचाव पथकाने दुसऱ्या दिवशीही अथक प्रयत्न सुरू ठेवले.
परदेशी बचाव पथकांनाच या मोहिमेत काल समावेश झाल्यावर अनेक मृतदेह सापडले. एका वृत्तसंस्थेनुसार, म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुखांनी १६४४ हून अधिक मृत्यूंची पुष्टी केली आहे, तर एका अमेरिकन एजन्सीने इशारा दिला आहे की ही संख्या १०,००० पेक्षा जास्त असू शकते.
चीनच्या युनान प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपात जेव्हा चीनमधील रुग्णालयाची इमारत झुल्यासारखी हादरत होती, तेव्हा येथील परिचारिकांनी नवजात बालकांना वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये, चिनी परिचारिका भूकंपाच्या धक्क्यामुळे बाळाच्या पाळणा कोसळण्यापासून वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. एक नर्स नवजात बाळाला मांडीवर घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Atouching moment during the tragedy:
The earthquake in Myanmar was felt in Ruili, Yunnan, China, where two nurses at Jingcheng Hospital’s maternity center were seen shielding infants: pic.twitter.com/xDNqPAb9tt— China in Pictures (@tongbingxue) March 28, 2025
परिचारिकांच्या धाडसाचे कौतुक :
भूकंपाच्या वेळी परिचारिकांनी धाडस दाखवत नवजात बालकांना वाचवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. जेव्हा भूकंप झाला तेव्हा परिचारिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळण्याऐवजी नवजात बालकांना वाचवण्याला प्राधान्य दिले.
इमारत हादरत असतानाही तिने पाळणे धरून ठेवले आहे. युनानमधील जिंगचेंग रुग्णालयाचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे रुग्णालयाची इमारत हादरली असतानाही ज्या कामगारांनी पाळणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचे खूप कौतुक केले जात आहे.
सोशल मीडियावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘परिचारिकांच्या धाडसाला सलाम. ते खूप भीतीदायक होते पण मला आनंद आहे की ती मुले ठीक आहेत. अनेकांनी परिचारिकांचे कौतुक केले आहे आणि त्यांना रिअल हिरो म्हटले आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान :
शक्तिशाली भूकंपामुळे रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भाग अजूनही संपर्कापासून खंडित आहेत. म्यानमारच्या लष्करी सरकारने सांगितले की शनिवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या १,६४४ वर पोहोचली आहे.
तर किमान २,४०० लोक जखमी झाले आहेत. अनेक भागात बचावकार्य जोरात सुरू आहे, परंतु रस्ते आणि पुलांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी पोहोचणे अजूनही कठीण आहे.





