पिंपरी : भोसरी येथील महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-२ येथे कार्यरत सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि त्यांच्या ओळखीच्या खाजगी इसम श्यामलाल असोकन (वय ३४) यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता. काम करून देण्यासाठी नरवडे यांनी सुरुवातीला ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान नरवडे यांनी तडजोड करत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. ५ जून रोजी, सापळा रचण्यात आला. यामध्ये तक्रारदाराकडून नरवडे यांनी खाजगी इसम श्यामलाल असोकन याला लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.