Victoria Lake – वरवंड (ता. दौंड) मध्ये परिसरात चांगला पाऊस होऊनही वरवंड येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा सध्या केवळ १८ टक्क्यांवर आला असल्याची माहिती उत्कर्ष पाटील यांनी दिली. यामुळे तलावावर अवलंबून असलेल्या आठ गावांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सुमारे ३१० एकर क्षेत्रात पसरलेला हा तलाव १८७६ मध्ये ब्रिटिशकालीन काळात बांधण्यात आला होता. दौंड व बारामती तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक गरजांसाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तलावाची साठवण क्षमता सुमारे २०० लक्ष घनफूट आहे. विशेष म्हणजे जून २०२५ मध्ये मुसळधार पावसामुळे हा तलाव १०० टक्के भरला होता. मात्र, भरपूर पाऊस होऊनही काही महिन्यांतच पाणीसाठा १८ टक्क्यांवर आल्याने जलनियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तलावातील गाळ साचणे, वाढता वापर, बाष्पीभवन आणि पाण्याचे अपुरे व्यवस्थापन ही कारणे पुढे येत आहेत. एमआयडीसीलाही धोक्याची घंटा या तलावातून कुरकुंभ एमआयडीसी, जानाई-शिरसाई योजना तसेच स्थानिक शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. तलावातील गाळ काढणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि दीर्घकालीन जलसंधारण प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.