पती-पत्नीच्या भांडणात निष्पाप चिमुरड्यांचा बळी; क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना फेकले विहिरीत

मुंबई : आई-वडिलांच्या वादाची, भांडणाची झळ ही त्यांच्या मुलांना सहन करावी लागते असं म्हणता आणि याचाच प्रत्यय अहमदनगरमध्ये आला आहे. आई-वडिलांच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन चिमुरड्याने विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना याठिकाणी घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोकुळ क्षीरसागर असे क्रूर पित्याचे नाव आहे. तर ऋतुजा (8 वर्षे) आणि वेदांत (4 वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी ही घटना घडली. गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरसागरने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत आपल्या दोन्ही मुलांना फेकलं. काही वेळातच दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर गावकरी घटनास्थळी धावत गेले. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ शिरसागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गोकुळ शिरसागर याच्या दारुचे व्यसन आणि घरगुती भांडणातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परंतु या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





