Rajgurunagar : खेड तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा डळमळीत
Rajgurunagar : जनावरांना आजार झाल्यास उपचारांसाठी शेतकर्यांना धावपळ करावी लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यास पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने रिक्त पदे तातडीने भरून पशुवैद्यकीय सेवा सुरळीत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पशुधनाच्या आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेचे 24 आणि राज्य शासनाचे 13 असे एकूण 37 पशुवैद्यकीय दवाखाने तालुक्यात आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या नऊ आणि राज्य शासनाच्या दोन दवाखान्यांत पशुवैद्यकीय डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने पशुधनावर वेळेत उपचार करण्यात अडचणी येत आहेत. त्यातच जिल्हा परिषदेच्या 15 आणि राज्य शासनाच्या सात दवाखान्यांत परिचरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकर्यांना उपचारांसाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असून, रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोंदे, आळंदी, वाडा, कडूस, डेहणे, मरकळ, येलवाडी, आंबोली, धामणगाव खुर्द आणि टोकावडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांत डॉक्टर उपलब्ध नाहीत. राज्य शासनाच्या कोहिंडे आणि वेताळे येथील दवाखान्यांतही डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. विशेषतः पश्चिम आदिवासी आणि डोंगराळ भागात पशुधनाची संख्या मोठी असताना पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जनावरांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे येत आहेत. डॉक्टरांसह परिचरांची पदेही रिक्त असल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जनावरांना आजार झाल्यास उपचारांसाठी शेतकर्यांना धावपळ करावी लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यास पशुधनाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने रिक्त पदे तातडीने भरून पशुवैद्यकीय सेवा सुरळीत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शेतकर्यांनी उपलब्ध चारा जपून वापरावा. जनावरांसाठी चारा कमी पडू नये, यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या तालुक्यात चारा आणि पाणीटंचाई नसल्याने पशुपालकांना दिलासा मिळत असल्याचे डॉ. मुसळे यांनी सांगितले.
एक लाखांहून अधिक पशुधन; आरोग्यसेवेवर ताण
खेड तालुक्यात 55 हजार 819 गायी-बैल, 19 हजार 602 म्हशी-रेडे, 4 हजार 30 वासरे, 20 हजार 850 शेळ्या-बोकड आणि 2 हजार 901 मेंढ्या-मेंढे असे एकूण 1 लाख 3 हजार 202 पशुधन आहे. या पशुधनाला जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या 37 दवाखान्यांमधून आरोग्यसेवा पुरविली जाते. मात्र, डॉक्टर आणि परिचरांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध यंत्रणेवर ताण वाढला आहे.
खेड तालुक्यात जनावरांच्या लाळ्या-खुरकूत आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाची नववी फेरी पूर्ण झाली आहे. या आजारासह अन्य आजारांपासून संरक्षणासाठी आतापर्यंत 60 हजार 203 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
-डॉ. नानासाहेब मुसळे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी
पशुखाद्यासाठी बियाण्यांचे वाटप
पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पहिल्या टप्प्यात पशुपालकांना 2 हजार 932 किलो संकरित मका बियाणे, 1 हजार 924 किलो संकरित मका (अॅडव्हांटा) बियाणे आणि 350 किलो संकरित गोड ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. दुसर्या टप्प्यात आदिवासी भागातील शेतकर्यांना 11 किलो संकरित मका बियाणे देण्यात आले आहे.
पशुधन विमा योजनेचा लाभ घ्या
शासनाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत शेतकर्यांना विमा हप्त्यावर 85 टक्के अनुदान मिळणार आहे. एक ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी विमा काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. गाय-बैल : 70 हजार रुपये विमा रक्कम, म्हैस-रेडा : 80 हजार रुपये विमा रक्कम, शेळी-मेंढी : 60 हजार रुपये विमा रक्कम. विमा काढण्यासाठी एका वर्षासाठी 4.3 टक्के, दोन वर्षांसाठी 7.5 टक्के आणि तीन वर्षांसाठी 10.5 टक्के दराने विमा हप्ता भरावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. नानासाहेब मुसळे यांनी केले आहे.





