मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. रुपेरी पडद्यावर ‘खाष्ट सासू‘ किंवा ‘क्रूर सासू’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या दयाताईंनी आपल्या अभिनयाने मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. कलेचा वारसा आणि सुरुवातीचे जीवन ११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना अभिनय आणि संगीताची गोडी घरातूनच मिळाली. त्यांच्या आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या नावाजलेल्या गायिका आणि अभिनेत्री होत्या. लहानपणापासूनच दयाताईंना गायिका होण्याची प्रचंड इच्छा होती. शालेय जीवनात त्यांनी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत यांचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन समारंभात गाणे सादर केले होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेताना पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यांतून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले, ज्यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला नेहमी पाठबळ दिले. ललिता पवार यांच्यानंतरची ‘खलनायिका’ मराठी चित्रपटसृष्टीत ललिता पवार यांच्यानंतर खलनायिकेच्या भूमिका साकारणारे दुसरे मोठे नाव म्हणजे दया डोंगरे. आव्हान’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून‘ अशा चित्रपटांमधून त्यांनी खलनायिकेच्या भूमिका अविस्मरणीय केल्या. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी ‘आश्रय’, ‘जुंबिश’, ‘नामचीन’, ‘दौलत की जंग’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. त्यांनी मालिका आणि नाटकांमध्येही सक्रिय सहभाग घेतला. मात्र, १९९० नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारली. जीवन गौरव पुरस्काराने सन्मान २०१९ मध्ये महाराष्ट्र नाट्य परिषदेने दया डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यांच्या अभिनयाचा वारसा आणि मराठी चित्रसृष्टीतील योगदान यामुळे त्यांना नेहमी आदराने लक्षात ठेवले जाईल. दया डोंगरे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रसृष्टीने एका सशक्त अभिनयशिल्पीला मुकले आहे.