महायुतीच्या दोन आमदारांत जुंपली; सुरेश धस – अमोल मिटकरींमध्ये शाब्दिक चकमक

Mla Suresh Dhas-Mla Amol Mitkari : महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. याला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांनी सुपारी घेतली असल्याची टीका केली होती. मात्र, यावर आता सुरेश धस यांनी देखील जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. अमोल मिटकरी अतिशय लहान आहेत. त्यांनी उंटाचा ….. घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात धस यांनी मिटकरी यांना सुनावले आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, अमोल मिटकरी लहान आहे.. तू कोणाच्या नादी लागतोय?. या रगेलच्या नादी लागू नको.. तुझे लय अवघड होईल. अमोलला माझं सांगणं आहे तू कोणाच्या ही खिशात हात घाल माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको. या आगीत तेल ओतण्याचे काम तू करू नको, असा सल्लाही भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना दिला. ते बीड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुरेश धस म्हणाले, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना धस म्हणाले, तपासाच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीत नवीन एसपी यांना कोण कशा पद्धतीने वागत हे सांगितलं पाहिजे. इथले काही पोलीस हे आकाने नेमणूक केल्याने संपूर्ण माहिती आकाला पुरवतात. हे होणं अत्यंत घातक आहे, पोलीस दल आरोपींना मदत करत असेल तर अवघड आहे. आकापर्यंत पोहोचेपर्यंत माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आका पुढे जातो. पीक विमा, राख, गायरण जमीन ढापण्याचा पॅटर्न आम्ही सांगितलं, उद्या अजून लोकं येणार आहेत त्यांच्यासमोर अजून पॅटर्न सांगू .
संतोष देशमूख प्रकरणतील आरोपी सापडले पाहिजेत हे आमचं मत आहे, वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. माझे आणि वाल्मिक कराड यांचे काय सुमधुर संबंध होते हे उद्या जाहीरपणे सांगणार आहे. तुमच्याबरोबर (धनजय मुंडे) देखील माझे संबंध होते, का बिघडले सांगा म्हणा. कोण अमोल मिटकरी? अमोलला माझं सांगणं आहे तू कोणाच्या ही खिशात हात घाल माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको. या आगीत तेल ओतण्याचे काम तू करू नको, असा सल्लाही भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना दिला.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना…, प्राजक्ता माळी.., सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे..थर्मल मधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत…आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत.. नाही आले कोणी तर धनुभाऊ आपले विमान खाली आणा.. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे.. आमचा लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा.. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही.. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत.. मुस्लिम लोक सहभगी होणार आहेत..
वाल्मीक कराड यांच्याशी माझे कसे संबंध आहेत ते सांगा की मधुर आहेत.. अमधुर आहेत.. तुम्ही सुद्धा माझे मित्र होते.. माझ्याकडे कागद आहेत.. ती तारीख सांगतो.. कधीपासून ते माझे मित्र राहिले नाही..अमोल मिटकरी लहान आहे.. तू कोणाच्या नादी लागतोय.. या रगेलच्या नादी लागू नको.. तुझे लय अवघड होईल, असंही सुरेश धस म्हणाले.
अमोल मिटकरी काय म्हणाले होते-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. बीडमधील काही आमदारांनी यासंबंधी वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे. यात भाजप आमदार सुरेश धस यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही निशाणा साधला.





