Velhe Murder Case: किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून; राजगड तालुक्यातील धक्कादायक घटना
Velhe Murder Case: राजगड तालुक्यातील मालवली गावच्या हद्दीत राजतोरण शाळेच्या मैदानावर किरकोळ वादातून १८ वर्षीय विकास जाधव याचा खून.

Velhe Murder Case – गाडीवर बसण्याच्या आणि किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, एका १८ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मालवली (ता. राजगड) गावच्या हद्दीत राजतोरण शाळेच्या मैदानावर घडली. विकास सुरेश जाधव (वय १८, रा. मालवली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात एका विधीसंघर्षित बालकाविरुद्ध (अल्पवयीन) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन पांडुरंग पवार (वय २३, सध्या रा. मालवली, मूळ रा. खवली, जि. रायगड) हे रविवारी (दि. १४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मयत विकास जाधव व त्यांच्या अन्य एका साथीदारासोबत करंदी येथील काम पाहून परत येत होते. दरम्यान, रस्त्यात थांबून ताडी पिल्यानंतर गाडीवर बसण्याच्या कारणावरून विकास व त्याच्या साथीदारामध्ये वाद झाला. त्यावेळी फिर्यादी रोहन यांनी हा वाद सोडवला.
त्यानंतर राजतोरण शाळेच्या मैदानावर झालेल्या भांडणात संबंधित अल्पवयीनाने विकास जाधव याचा हाताने जोरात गळा दाबला. हा वाद काही जणांनी सोडवल्यानंतर विकास हा काहीच बोलत नसल्याने आणि पाणीही पीत नसल्याचे पाहून मित्रांनी त्याला तातडीने वेल्हे येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी विकासला उपचारापूर्वीच ‘मयत’ घोषित केले.
मेहुणा विकास जाधव याचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी रोहन पवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते करत आहेत.





