पाच युवकांकडून तलवारीने वाहनांची तोडफोड

सातारा- येथील विसावा नाक्यावर पाच युवकांच्या टोळक्यांनी हातात तलवार, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड केली तसेच एका युवकावर वारही केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली असून, पोलीस संबंधित युवकांचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विसावानाका परिसरातील राजपुरोहित दुकानासमोरून शुक्रवारी दुपारी तीन वाजता एक ओमणी कार चालक बॉम्बे रेस्टॉरंटकडे निघाला होता. यावेळी अचानक समोरून पाच युवक हातात तलवार, कोयता घेऊन धावत आले. आरडाओरड करत त्या युवकांनी कारच्या समोरील काचेवर तलवारीने वार केला. त्यानंतर कारच्या आजूबाजूच्या काचाही फोडल्या. तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकीचीही संबंधित युवकांनी तोडफोड केली. नेमका काय प्रकार आहे, हे कोणालाही समजत नव्हते.
एका दुचाकीवर तिघे युवक तर दोन युवक दुचाकीच्या मागून धावत होते. रस्त्यावरून ये-जा करणाºयांना धमकी सुद्धा देत होते. या प्रकारामुळे गांगरून गेलेल्या काही दुकानदारांनी तत्काळ आपापली दुकानेही बंद केली. हातात तलवार आणि कोयता पाहून दुकानदारांची पाचावर धारण बसली. अचानक हल्लेखोर दुकान शिरले तर, या भीतीने दुकानदार हतबल झाले होते. काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांशी संपर्क झाला नाही. भर रस्त्यातून उघड्या तलवारी घेऊन फिरणारे युवक नेमके कोठून आले. हे तेथील दुकानदारांना समजले नाही. संबंधित युवकांची खेड फाट्यावर दोन गटांत वादावादी झाली होती. त्यानंतर संबंधित युवक धावत विसावा नाक्यावर आले. या प्रकारानंतर संबंधित युवक तेथून पसार झाले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.





