वेध : भविष्यावर प्रश्नचिन्ह

युक्रेन-रशिया युद्ध इतक्यात संपेल असे वाटत नाही. दोन्ही देश हे निर्णयात्मक पाऊल टाकण्यास अपयशी ठरले आहेत आणि म्हणूनच युद्ध लांबले आहे.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. इंधनाचे दर भडकले. युक्रेनमध्ये प्रचंड मनुष्य आणि वित्तहानी झाली. दररोज हल्ले करूनही रशियाच्या हाती फारसे काही लागत नसल्याचे दिसून येते. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनची स्थिती बिघडली असून प्रतिकारशक्तीदेखील हळूहळू क्षीण होत चालली आहे. भारताच्या बाजूने विचार केल्यास या युद्धामुळे रशिया-चीन हे दोघे जवळ आले तर ती बाब अस्वस्थता निर्माण करणारी ठरू शकते. म्हणून युद्ध लवकर संपल्यास नव्या संभाव्य धोकादायक समीकरणांना पूर्णविराम मिळू शकतो.
रशियन सैनिकांच्या हल्ल्याच्या सावटाखाली गेल्या आठवड्यात युक्रेनने 31 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. रशियाच्या हल्ल्यास सहा महिन्यांचा कालावधीही पूर्ण झाला. युक्रेनमध्ये एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष होता तर दुसरीकडे युद्धामुळे विस्कळीत झालेले जनजीवन दिसले. जेव्हा रशियाने युक्रेनमधील चॅपलने रेल्वे स्थानकाला लक्ष्य केले तेव्हा त्यात 25 जण ठार झाले. युक्रेन या रेल्वेतून सैनिक आणि शस्त्रे घेऊन जात असल्याने हल्ला केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. आता जपोरिजियावरून देखील युरोपच्या चिंतेत भर पडली आहे. तेथे सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तेथे दोन्ही बाजूंनी बॉम्बवर्षाव केला जात आहे. परिणामी अणुस्फोट होण्याची भीती वर्तविली जात आहे.
युक्रेनच्या तुलनेत रशियाचे सैन्य आकाराने आणि क्षमतेने मोठे असले तरी सहा महिन्यांनंतर रशिया आपले ध्येय गाठण्यात अपयशी ठरला आहे. रशिया सहजपणे युक्रेनवर ताबा मिळवेल, असे युद्धापूर्वी सांगितले जात होते. रशियन सैनिक प्रशिक्षित, शस्त्रसज्ज आणि बलाढ्य आहेत; परंतु या युद्धात त्यांची बहादुरी कोठेच दिसली नाही. रशियाच्या सैनिकांची कामगिरी सुमार राहिली. आपले ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीच्या काळात रशियाने किव्हकडे कुच केली; परंतु तेथून त्यांना माघार घ्यावी लागली. आता त्यांचे लक्ष्य दक्षिण आणि पूर्वेकडे आहे. रशियन सैनिक आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. ते शहरात लुटमार करत आहेत. रशियन सैनिक हे अपयशाचा राग हे नि:शस्त्र असलेल्या लोकांवर काढत आहेत.
दुसरीकडे युक्रेनने रशियाच्या हल्ल्यास प्रतिकार करताना जागतिक स्वरूप दिले. युक्रेनला युरोपीय देशांकडून मदत मिळत आहे. या आधारावर रशियाला चिवटपणे झुंज देत आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. मानवी नुकसान हे बराच काळ भरून न येणारे आहे. तसेच शस्त्रसाठा देखील कमी होत चालला आहे.
एकंदरीतच दोन्ही बाजूंनी शस्त्रे कमी होत आहेत. युरोपीय आणि अन्य देशदेखील गरजेनुसार युक्रेनला मदत करत आहेत. त्यामुळे आता हे युद्ध किती काळ चालेल, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. युद्धातील अनिश्चितता पाहता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी एक कायदा केला आणि लष्करात नव्याने भरती करण्याचा निर्णय घेतला. यानुसार लष्करात 1 लाख 37 हजार जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमुळे रशियात कॉम्बेट पर्सनलची संख्या 20.4 लाख झाली आहे. मनुष्यहानीची भरपाई करणे कठीण आहे आणि याची जाणीव पुतीन यांना आहे. म्हणून त्यांनी अजूनही संपूर्ण सैन्य उतरवलेले नाही. बहुतांश ठिकाणी “अनमॅन मशीन’चा वापर केला आहे.
रशियाच्या तुरुंगात अनेक कैदी असून त्यांनादेखील युद्धात उतरवण्याची शक्यता आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतीन यांना राजकीय पाठिंबा हवा आहे. यासाठी त्यांनी कायदा मंजूर केला आहे. यात त्यांनी युद्धाची वाटचाल अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे मान्य केले आहे. परिणामी रशियाला आणखी आर्थिक भार उचलावा लागणार आहे. रशियाच्या नव्या रणनीतीनुसार आगामी काळात युक्रेनवर पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्याची तयारी केली जात आहे. सध्या हिवाळा येत असल्याने व्यापक मोहीम हातात घेण्याची शक्यता कमीच आहे.
दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की अजूनही संपूर्ण विजय मिळवण्याची भूमिका मांडत आहेत. नुकसान मात्र कमालीचे होत आहे. त्यांचा दृष्टिकोन हा युरोपीय आणि पश्चिम देशांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.
प्रारंभीच्या काळात रशियाने हे युद्ध काही दिवसच चालेल, असे म्हटले होते. परंतु युक्रेनला चिवट वृत्तीने रशियाला मनसुबे पूर्ण करता आले नाही. परंतु युक्रेनला आणखी किती काळ आर्थिक सहकार्य लाभणार हा देखील प्रश्न आहे. कारण, युरोपातील आर्थिक स्थिती देखील बिघडत चालली आहे. महागाई वाढत चालली आहे. तेल आणि धान्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. कुठपर्यंत मदत करावी या विचाराने देखील युरोपीय लोक थकले आहेत. कारण युरोपने असे अनेक पावले उचलली आहेत की, युद्ध नसलेल्या काळात देखील ते निर्णय घेतले गेले नसते.
आता प्रश्न असा आहे की, पुढे काय होणार? आगामी काळात युद्धाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे रशिया आणि चीन यांच्यात वाढलेली जवळीकता. रशिया हा एका अर्थाने चीनचा ज्युनिअर पार्टनर होत आहे. जसजसे चीन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध वाढेल, तसतसे चीनवर अवलंबून राहणारा साथीदार म्हणून रशियाची भूमिका देखील वाढत जाईल. मात्र या आघाडीतून खरा प्रश्न हा हिंद प्रशांत क्षेत्रात निर्माण होणार आहेत. आगामी काळात हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्रबिंदू राहणार आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत एकप्रकारे भरच पडणार आहे. रशिया हा भारताचा महत्त्वाचा संरक्षण साथीदार आहे. म्हणूनच भारताने आतापर्यंत आपल्या प्रतिक्रियेतून रशियाला
टार्गेट केलेले नाही. या युद्धावर राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा, अशी भारताची भूमिका आहे. रशिया हा चीनच्या बाजूने झुकला जाऊ नये, असे भारताला वाटते; परंतु त्याला रोखण्यासाठी भारताची क्षमता ही खूपच कमी आहे.
चीन आणि अमेरिका शीतयुद्धातून जी स्थिती निर्माण होत आहे, त्यात भारत कसा वाटचाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तत्पूर्वी रशियाला सोबत ठेवून आपण चीनला शह देऊ शकतो, असा भारत विचार करत होता. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे चीनवर रशियाचे वाढते अवलंबत्व हे भारताला चिंताजनक आहे. कारण अशा स्थितीत रशियाशी ताळमेळ बसविताना अनेक अडचणी येऊ शकतात.
हर्ष व्ही. पंत





