Vasota Fort : वनदुर्ग किल्ले ‘वासोटा’ तीन दिवस राहणार बंद ! कारण काय पाहा?

Vasota Fort – सहयाद्रीच्या डोंगररांगांमध्ये कोयना अभयारण्यामधील घनदाट जंगलामध्ये आणि शिवसागराच्या विशाल जलाशयाच्या कडेला असलेला ‘वासोटा किल्ला’ पर्यटकांसाठी काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. सोमवार दि. ३० डिसेंबर ते बुधवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळपर्यंत वासोटा किल्ला परिसरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.
प्रसिद्ध पर्यटन स्थळ व निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स याचा आवडता वनदुर्ग म्हणून वासोटा किल्ल्याची ओळख आहे. जावळी तालुक्यातील दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास दरवर्षी प्रमाणे ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे.
ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमींसह पर्यटकांना या किल्ल्याची कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपत्तीला कोणतीही हानी पोहचू नये, यासाठी पर्यटकांना ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत वासोटा किल्ला गाभा क्षेत्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग क्लबना देण्यात आल्या आहेत. या काळात वासोटा किल्ला परिसरात कोणीही बेकायदेशीररीत्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बामणोली वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अधिकारी विजय बाठे यांनी दिली.





