Vasant More : वसंत मोरे यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा! पत्रकार परिषदेतील ‘ते’ वक्तव्य अंगलट..नेमकं प्रकरण काय?
Vasant More : शिवाजीनगर पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह बदनामीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला; वसंत मोरेंकडून अद्याप प्रतिसाद नाही.

Vasant More – माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल झाला आहे. विश्वनाथ तुकाराम लहाडे ( ७२) यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांच्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी रोजी महापालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
त्यावेळी त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केली. फिर्यादीनुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अपमानास्पद वक्तव्य केले.तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे, असे वक्तव्य केले.
हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद केले आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात असल्याचेही फिर्यादींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान वसंत मोरे यांच्याशी दै.प्रभातने संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.





