Varsha Gaikwad : “बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटलाच नाही’ – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा काळातच हा प्रकार घडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
या शिक्षकाने केमिस्ट्रीचा पेपर आपल्या कोचिंग क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला होतो. शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास केमिस्ट्रीचा पेपर सुरु होणार होता. मात्र, परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने एकच गोंधळ झाला आहे.
दरम्यान, आता या सर्व घटनेवर शालेय शिक्षण मंत्री ‘वर्षा गायकवाड’ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नसून, प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेत निवेदन सादर करत असताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या की..,’नियमानुसार सकाळी १०.३० वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.३४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.





