Varsha Gaikwad : हा जनतेच्या कौलाचा अपमान.! ठाकरेसेनेमधील फूटीच्या वृत्तावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया
ठाकरेसेनेमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून, ही बाब जनतेच्या कौलाचा अपमान करणारी आहे.

Varsha Gaikwad – ठाकरेसेनेमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून, ही बाब जनतेच्या कौलाचा अपमान करणारी आहे. या घडामोडी लोकशाहीचा आणि मतदारांचा घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली.
खासदार गायकवाड यांनी एका निवेदनात म्हटले की, संविधानाचे रक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपविरुद्ध एकजुटीने लढवली होती, मात्र भाजपविरोधी भूमिकेवर निवडून आलेले काही खासदार आता सत्ताधारी पक्षाची बाजू घेत आहे.
ठाकरेसेनेतील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केले होते, परंतु या खासदारांनी त्या कौलाकडे दुर्लक्ष केले आणि ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
भाजपची राजकीय रणनीती ही विरोधी पक्षांमधील नेत्यांमध्ये फूट पाडणे आणि त्यात अपयश आल्यास संपूर्ण पक्ष फोडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्याकडे वळवणे हीच राहिली आहे. हा मतदारांचा घोर अपमान आहे.
ज्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रचार केला, त्यांनीच ठेवलेल्या विश्वासाचा विश्वासघात केला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांनी जनतेच्या भावनांचा आदर करावा आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.




