Pune | दिव्यागांना विविध सेवा ऑनलाइन देणार

पुणे, – दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना देत असलेल्या विविध सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातंर्गत अधिसूचित करण्याकरीता तसेच यापूर्वी अधिसूचित केलेल्या सेवांचे पुनर्मूल्यांकन आणि ऑफलाइन देण्यात येत असलेल्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.
राज्य शासनामार्फत राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व कालमर्यादेत लोकसेवा उपलब्ध करुन देण्यात येतात. लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेवून, त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आला आहे.
दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येत असलेल्या विविध सेवा क्षेत्रिय कार्यालयामार्फत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य मुख्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखालीआयोजित केलेल्या बैठकीत आयोगाने दिव्यांग कल्याण विभाग विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्याची तसेच यापूर्वी अधिसूचित केलेल्या सेवांचे पुनर्मुल्यांकन करण्याकरीता ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील दिव्यांग व्यक्तीना देत असलेल्या सेवांचा आढावा घेवून अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्यासाठी त्याचप्रमाणे ऑफलाइन देत असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यता मिळालेली आहे. या समितीत १२ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
अभ्यासगटाने विभागांतर्गत अधिकाधिक सेवांचा आढावा घेवून सेवा निश्चित करुन संबंधित सेवा, सेवा पुरविणारा अधिकारी, कालावधी, प्रथम अपिलीय अधिकारी, व्दितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशिल शासनास तीस दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे.





