नाशिक : दिवाळी सणाचे निमित्त समोर ठेवून राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आधीच तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतक-यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. दिघोळे म्हणाले, शेतकरी दिवसरात्र राबून कांद्याचे उत्पादन घेतो आणि त्याचा माल विक्रीसाठी आणल्यावर बाजार बंद असल्याची पाटी त्याच्या तोंडावर आपटली जाते. शेतक-यांना दगड समजून त्यावर चालल्यासारखी वागणूक देणे आता थांबवले पाहिजे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, शेतक-यांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावरही अन्यायच मिळतो. राज्य शासनाने बाजार समित्यांना शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठा कोणाच्या खासगी मालकीच्या नसून, त्या शेतक-यांच्या श्रम आणि उत्पादनावर उभ्या आहेत. जास्त दिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे. लिलाव बंद ठेवण्याचे अधिकार हे सणाच्या प्रमुख दिवसांपुरते मर्यादित असावेत आणि शेतक-यांच्या हिताला धक्का पोहोचवणारे निर्णय घेणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने तातडीने या मुद्यावर लक्ष घालून शेतक-यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. आधीच शेतक-यांच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता एकाच वेळी जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्या तर पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्यानंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढून यापेक्षाही कमी दर मिळण्याचे संकट शेतक-यांवर येईल. त्यामुळे राज्य सरकारने कांदा बाजारपेठेचे सुयोग्य नियमन आणि पारदर्शक व्यवहारासाठी ठोस धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.