Stock Market: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 4.79 लाख कोटी रुपयांचे नुकसान
Stock Market: कच्च्या तेलाने प्रति बॅरल १२० डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे डॉलर मजबूत झाला आणि रुपयाच्या मूल्यात मोठी घट झाली आहे. याचा दबाव ऑटो, बँकिंग, मेटल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांवर स्पष्टपणे दिसून आला.

Stock Market: जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम गुरुवारी मुंबई शेअर बाजारावर झाला.
दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसई सेन्सेक्स ५८२.८६ अंकांच्या म्हणजेच ०.७५ टक्क्यांच्या घसरणीसह ७६,९१३.५० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी १८०.१० अंकांच्या म्हणजेच ०.७४ टक्क्यांच्या घसरणीसह २३,९९७.५५ या पातळीवर स्थिरावला.
विशेष म्हणजे, व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० हून अधिक अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती, मात्र अखेरच्या सत्रात आलेल्या काहीशा रिकव्हरीमुळे बाजार सावरला.
गुंतवणूकदारांना मोठा फटका – (Stock Market)
Stock Market: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 4.79 लाख कोटी रुपयांचे नुकसान
या घसरणीचा सर्वाधिक फटका गुंतवणूकदारांना बसला असून एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल ४.७९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बुधवारी बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४,६८,२४,२६४ कोटी रुपये होते, जे गुरुवारी कमी होऊन ४,६३,४४,७०७ कोटी रुपयांवर आले.
कच्च्या तेलाने प्रति बॅरल १२० डॉलरचा टप्पा ओलांडला –
कच्च्या तेलाने प्रति बॅरल १२० डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे डॉलर मजबूत झाला आणि रुपयाच्या मूल्यात मोठी घट झाली आहे. याचा दबाव ऑटो, बँकिंग, मेटल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांवर स्पष्टपणे दिसून आला.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवले असले तरी कडक धोरण कायम ठेवल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमधील परकीय गुंतवणुकीवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Stock Market)
३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ९ कंपन्यांचे शेअर वधारले –
सेंसेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ९ कंपन्यांचे शेअर वधारले, तर उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर लाल रंगात बंद झाले. झोमॅटोची मालकी असलेल्या इटरनल कंपनीच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.८४ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर विक्रीच्या दबावाखाली राहिले. Stock Market
दुसरीकडे, बाजाराच्या या प्रतिकूल परिस्थितीतही आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी थोडा आधार दिला. सन फार्मा, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि अदाणी पोर्ट्स यांसारखे समभाग वाढीसह बंद झाले. बीएसईवर एकूण ४३३७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यापैकी २५३२ शेअर्स घसरले तर १६४९ शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. आगामी दीर्घ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे.





