Satara: ‘यशोदा’च्या वर्धापन दिनी विविध उपक्रमांचे आयोजन
Satara वर्धापन दिन सप्ताहाची सुरुवात 10 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराने आणि जागतिक वास्तुकला दिनानिमित्त आयोजित विशेष उपक्रमाने होणार आहे. त्याच दिवशी विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय दृष्टिकोन, कल्पकता आणि व्यावसायिक कौशल्यांना चालना देण्यासाठी ‘शार्क टँक बिझनेस आयडिया’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Satara: यशोदा शिक्षण संस्थेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 10 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, संशोधनवृत्ती विकसित करणे आणि संस्थेतील एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, हा या उपक्रमांमागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांची सांगता 20 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या वर्धापन दिन समारंभाने होणार आहे.
वर्धापन दिन सप्ताहाची सुरुवात 10 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराने आणि जागतिक वास्तुकला दिनानिमित्त आयोजित विशेष उपक्रमाने होणार आहे. त्याच दिवशी विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय दृष्टिकोन, कल्पकता आणि व्यावसायिक कौशल्यांना चालना देण्यासाठी ‘शार्क टँक बिझनेस आयडिया’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या व्यावसायिक कल्पना सादर करण्याची आणि नवउद्योजकतेच्या संधी समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
13 ऑक्टोबर रोजी ‘यशोदा युवा वक्ता’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी ‘लाईफ अॅट वायएसपीएम’ या विषयावर रील मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना संस्थेतील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन जीवनातील अनुभव सर्जनशील पद्धतीने मांडता येणार आहेत. याच दिवशी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धा 2026-27 संदर्भातील उपक्रमालाही महत्त्व देण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित केली आहे. याच दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर रोजी ‘मायक्रो प्रोजेक्ट्स कॉम्पिटिशन’ आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना, प्रयोगशीलतेला आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला व्यासपीठ मिळणार आहे. 17 व 18 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. 18 ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा समारोप 20 ऑक्टोबर रोजी होणार्या यशोदा शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन समारंभाने होणार आहे.





