वरवरा राव 7 जानेवारीपर्यंत हॉस्पिटलमध्येच

मुंबई – एल्गार परिषदेप्रकरणी माओवाद्यांशी संबंध असलेल्याचा आरोप असलेले कार्यकर्ते-कवी वरवरा राव यांना पुढील वर्षी 7 जानेवारीपर्यंत नानावटी रुग्णालयातच ठेवण्यात यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.
वरवरा राव यांना खासगी रुग्णालयात ठेवण्याची मुदत आज संपत होती. ही मुदत आज न्यायालयाने वाढवली. विविध व्याधी असलेल्या वरवरा राव यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार गेल्या महिन्यापसून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
न्या. एस एस शिंदे आणि न्या. एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सोमवारी नानावटी रुग्णालयातील उपचाराची वरवरा राव यांची मुदत वाढवली. प्रकृतीअस्वाथ्यतेच्या कारणास्तव जमीन मिळावा या अर्जावरील सुनावणी न्यायालयाने 7 जानेवारीपर्यंत तहकूब केली. राव यांच्या प्रकृतीबाबतचा ताजा अहवाल पुढील सुनावणीला सादर करण्यचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
दरम्यान वरवरा राव यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्यांचे वकील आनंद ग्रोवर यांनी न्यायलयात सांगितले. राव यांच्या प्रकृतीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून अजूनही देखरेख केली जात आहे. त्यांच्या रक्तदाबामध्ये कायमच चढउतार होत आहे. ते बहुतेक काळ ग्लानीमध्येच असतात.
मात्र नानावटी रुग्णालयात राव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत राव यांच्या कुटुंबीयांच्यावतीने त्यांच्या कन्येने समाधान व्यक्त केले असल्याचेही ग्रोवर यांनी सांगितले.
राव यांना नानावटी रुग्णालयातून तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात अथवा जे.जे. रुग्णालयात हलवले जावे, अशी मागणी राज्य सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेने लावून धरली आहे. मात्र राव यांच्या प्रकृतीबाबतचा ताजा अहवाल बघितल्याशिवाय तसे निर्देश दिले जाऊ शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जून 2018 मध्ये अटक झाल्यानंतर राव जे जे हॉस्पिटल आणि तळोजा तुरूंग रुग्णालयाच्या बाहेरच आहेत. या वर्षी 16 जुलै रोजी त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले.





