वरंधा घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद; पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग

पुणे – पुण्याहून कोकणात जाण्यासाठी वरंधा घाटहा महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग आहे. पण, रस्ता दुरुस्तीसाठी तो पुन्हा बंद करण्यात आला आहे. दि. १ मेपासून काही दिवसांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला होता. पण, आता पुन्हा येथील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
सध्या उन्हाळी सुटीतील पर्यटनाचा हंगाम बहरात आहे. पुण्यातील बहुसंख्य पर्यटक या सुट्यांमध्ये कोकणात जाणे पसंत करतात. त्यांच्यासाठी भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंधा घाट हा जवळचा मार्ग आहे. पण, आता वरंधा घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहेत.
वरंधा घाटात रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. ही कामे सुरू असताना अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे दि. १ एप्रिलपासून ३० मेपर्यंत घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परंतु लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणूक लक्षात घेता, कोकणात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घाटातील रस्ता सुरू करण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे १ मेपासून काही दिवसांकरीता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. परंतु आता हामार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे.
असा असणार पर्यायी मार्ग
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी पर्यटक आणि अन्य प्रवाशांना वळसा घालून अन्य मार्गांचा वापर करावा लागणार आहे. पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
१. पुणे – पिरंगुट – ताम्हिणी घाट – निजामपूर रोड- माणगाव- राजेवाडी फाटा आणि पुढे इच्छितस्थळी
२. पुणे – सातारा महामार्ग – वाई -आंबेनळी घाट – पोलादपूर आणि पुढे इच्छितस्थळी





