सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडने व्हिडिओद्वारे स्पष्ट केली भूमिका; म्हणाला “दोषी असलो तर…”

Walmik Karad | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 22 दिवसानंतर वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. याप्रकरणी पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीआयडीसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
22 दिवसांनी वाल्मिक कराड शरण
वाल्मिक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणी होत आहे. तेव्हापासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, पोलीस किंवा सीआयडी कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आले नव्हते. अखेर 22 दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला आहे.
वाल्मिक कराड व्हिडिओत नेमकं काय म्हणाला ?
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. “मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे.”
पुढे त्याने म्हंटले की, “संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.
CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मिकी कराड यांचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. त्यानंतर वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन पुण्यात दाखवण्यात आले होते. त्यानुसार त्याचा पुण्यात मुक्काम असल्याचे समोर होते.
दरम्यान, आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवल्यामुळे वाल्मीक कराड समोर सरेंडरशिवाय आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आज पुण्यात वाल्मीक कराड सीआयडीला शरण आला.
हेही वाचा:





