“वाजपेयींची गाडी मनमोहन सिंग यांनी १० वर्षे वापरली, मोदीजींनी ७ वर्षांत ४ गाड्या बदलल्या”

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मर्सिडीज-मेबैक 650 गार्ड (Mercedes-Maybach S650 Guard VR10) बख्तरबंद कारमधून प्रवास करताना दिसणार आहेत. या कारच्या खिडक्यांना पॉली कार्बोनेटचा थर आहे. या कारमध्ये बसलेली व्यक्ती केवळ 2 मीटर अंतरावर होणाऱ्या 15 किलो वजनाच्या TNT स्फोटापासून सुरक्षित राहू शकते. मात्र या कारच्या खरेदीवरून विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे.
काँग्रेसनेते नितीन राऊत यांनी मोदींना टोला लगावला. त्यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला. वाजपेयींनी वापरलेली सरकारी गाडी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढची १० वर्षं वापरली. मोदीजींनी ७ वर्षांत बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, लँड क्रूझर आणि आता नवी बारा कोटींची मेबाक अशा ४ गाड्या बदलल्या आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.
नितीन राऊत यांच्या व्यतिरिक्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय?. देशात महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
वाजपेयींनी वापरलेली सरकारी गाडी डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढची १० वर्षं वापरली. मोदीजींनी ७ वर्षांत बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, लँड क्रूझर आणि आता नवी बारा कोटींची मेबाक अशा ४ गाड्या बदलल्या आहेत.
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) December 30, 2021
देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असा टोला त्यांनी लगविला.





