satara | वैशाख पौर्णिमा महोत्सव गिरवी मंदिरात उत्साहात

फलटण, (प्रतिनिधी)- गिरवी (ता. फलटण) येथील श्री गोपाल कृष्ण मंदिरात वैशाख पोर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा झाला. नृसिंह जयंतीनिमित्त दि. 21 मे रोजी पहाटे अभिषेक तसेच दुपारी आरती व सायंकाळी सर्व भक्तांना डाळ व पन्हे असा प्रसाद वाटण्यात आला.
वैशाखी पौर्णिमेदिवशी पहाटे श्रीगोपाल कृष्ण भगवानांना अभिषेक तसेच कृष्णभक्त बाबूराव देशपांडे महाराज यांच्या समाधीस अभिषेक, सकाळी सूक्त पठण, सकाळी दहा वाजता हभप संतोष भोळे यांचे कीर्तन, दुपारी आरती व महाप्रसाद तसेच दहिवडी येथील महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम व पालखी सोहळा पार पडला.
दुसऱ्या दिवशी फलटण येथील महिला मंडळाने विष्णुसहस्त्रनाम पठण व गीता अध्याय तसेच फलटण येथील भजनी मंडळाचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. दुपारी आरती, महाप्रसाद, संध्याकाळी हभप संतोष भोळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. यामध्ये बालगोपाळांनी विविध खेळ सादर केले.
दहीहंडीचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात सातारा, फलटण व गिरवी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नियोजन देवस्थान प्रमुख जयंतराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत देशपांडे व शुभदा देशपांडे यांच्या सहकार्याने झाले.





