Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला बाद करताच इंग्लंडच्या गोलंदाजाने गमावला संयम, रंगला नवा वाद!

Vaibhav Suryavanshi Fifty missed : वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-१९ संघाविरुद्ध पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी केली, पण त्याचे अवघ्या पाच धावांनी अर्धशतक हुकले. सलग दुसऱ्या सामन्यात तो अर्धशतकाच्या जवळ येऊनही आपली विकेट गमावून बसला. वैभव बाद झाल्यानंतर सुरू झालेल्या वादाबद्दल जाणून घ्या. खरे तर, वैभव बाद होताच इंग्लंड अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज संयम गमावून बसला आणि त्याने वैभववर ओरडायला सुरुवात केली.
वैभव सूर्यवंशी ११व्या षटकात अपरकट शॉट खेळताना बाद झाला. सीमारेषेवर त्याचा झेल सेबेस्टियन मॉर्गनने घेतला. वेगवान गोलंदाज जॅक होमने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात वैभव बाद झाला. वैभव बाद होताच जॅक होम त्याच्याकडे पाहून ओरडू लागला. हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोण आहे जॅक होम?
Vaibhav Suryavanshi scored 45 runs off 34 balls with 5 fours & 3 sixes.
Caught at the boundary. Home gave him a send-off. pic.twitter.com/FuZkg1AxsH
— Varun Giri (@Varungiri0) June 30, 2025
जॅक होम हा इंग्लंडचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे, जो इंग्लंड अंडर-१९ संघाचा भाग आहे. त्याने भारत अंडर-१९ विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला बाद करताना आक्रमक गोलंदाजी आणि उत्साह दाखवला. त्याच्या या आक्रमक वर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. वैभव सूर्यवंशी, जो आपल्या तुफानी फलंदाजीमुळे ओळखला जातो, त्याला बाद केल्यानंतर जॅक होमने दाखवलेला उत्साह हा त्याच्या आत्मविश्वासाचा आणि स्पर्धात्मक स्वभावाचा पुरावा आहे.
हेही वाचा – Wimbledon 2025 : स्वितोलिनाचा विम्बल्डनमध्ये धमाकेदार विजय, पहिल्याच फेरीत बोंडारला चारली धूळ!
वैभवचे सलग दुसऱ्यांदा हुकले अर्धशतक –
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४५ धावांवर बाद झाला, तर पहिल्या सामन्यात तो ४८ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये अप्रतिम कामगिरी केली असली, तरी लिस्ट ए क्रिकेटमधील त्याची कामगिरी सरासरीच आहे. त्याची फलंदाजी सरासरी प्रति सामना २१ धावा आहे, जी त्याच्या प्रतिभेच्या मानाने खूपच कमी आहे. असो, आता इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध आणखी तीन सामने बाकी आहेत, आता तो कसा पुनरागमन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





