Vaibhav Brother Century : वैभव सूर्यवंशीच्या धाकट्या भावाने पुन्हा ठोकलं वादळी शतक! १९ चौकार अन् ६ षटकारांची केली बरसात
Vaibhav Brother Century : वैभवचा अवघ्या १० वर्षांचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने एका स्थानिक सामन्यात ११९ चेंडूंत तब्बल १६८ धावांची धडाकेबाज खेळी करत क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Vaibhav Sooryavanshi Brother Aashirwad 168 Runs Local Match : भारतीय क्रिकेटचा १५ वर्षीय ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी हा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये निवड झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. २६ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी तो सध्या बेलफास्टमध्ये असून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत आहे. मात्र, वैभव भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरण्यापूर्वीच त्याच्या घरातून आणखी एका ‘रन मशीन’चा धमाका पाहायला मिळाला आहे. वैभवचा अवघ्या १० वर्षांचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने एका स्थानिक सामन्यात ११९ चेंडूंत तब्बल १६८ धावांची धडाकेबाज खेळी करत क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
धाकट्या भावाच्या खेळीवर ‘मोठा भाऊ’ खुश; इन्स्टा स्टोरीवर शेअर केला स्कोअर
आशीर्वादने या स्थानिक सामन्यात विरोधी संघाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत आपल्या १६८ धावांच्या खेळीत १९ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धाकट्या भावाचे हे कौतुक इन्स्टाग्राम स्टोरीवर सामन्याचे स्कोअरकार्ड शेअर करून केले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १० वर्षांच्या आशीर्वादने काही आठवड्यांपूर्वी समस्तीपूरमधील ताजपूर क्रिकेट अकॅडमीकडून खेळतानाही ८७ चेंडूंत २० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची शतकी खेळी केली होती.
Vaibhav Sooryavanshi’s brother Ashirvad is smashing hundreds. 😄🔥 pic.twitter.com/b1PANkMGNB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2026
प्रशांत राजने त्याला बाद केले होते, पण त्याच्या या सलग शतकांमुळे सूर्यवंशी कुटुंबातील दुसऱ्या खेळाडूची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वैभवचा सर्वात मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी हा सध्या शिक्षण घेत आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना वैभवने तब्बल २३० च्या वरच्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा कुटल्या होत्या.
“ज्यासाठी पहिल्यांदा बॅट उचलली, ते स्वप्न पूर्ण झालं!”
दुसरीकडे, भारतीय टी-२० संघात निवड झाल्याबद्दल वैभव सूर्यवंशीने बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. वैभव म्हणाला, “हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आयुष्यात ज्या कारणासाठी पहिल्यांदा हातात बॅट धरली होती आणि सरावासाठी मैदानावर पाऊल ठेवले होते, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. माझ्या क्रिकेटच्या प्रवासातील हे सर्वात मोठे पाऊल आहे.”





