Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने मैदानात पाय ठेवताच सचिन तेंडुलकरला टाकले मागे; न्यूझीलंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात मिळालेल्या संधीच सोनं करु शकला नाही आणि तो चार धावांवर बाद झाला. त्यानंतरही त्याने इतिहास रचला आहे.

Vaibhav Sooryavanshi Creates History in 2nd T20I vs New Zealand in Christchurch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा थरारक सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संधी मिळताच भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. पहिल्या टी-२० सामन्यात जखमी झालेल्या इशान किशनच्या जागी वैभवला संघात स्थान देण्यात आले असून, त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरताच त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत एक नवा इतिहास रचला आहे.
मैदानात उतरताच वैभवने सचिनचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास –
न्यूझीलंडच्या भूमीवर पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने जागतिक क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला. अवघ्या १५ वर्षे २११ दिवस वयात न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणारा तो जगातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरला आहे. यासह त्याने बांगलादेशच्या मोहम्मद शरीफचा २५ वर्षे जुना विक्रम (१६ वर्षे ६ दिवस) मोडला. या यादीत पाकिस्तानचा आकिब जावेद (१६ वर्षे १८५ दिवस) आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (१६ वर्षे २८४ दिवस) यांचाही समावेश असून वैभवने या दिग्गजांना मागे टाकले आहे.
न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले १८१ धावांचे लक्ष्य –
No fireworks from Vaibhav Sooryavanshi in Christchurch ❌
He goes for 4 (8) in his first game of the tour.
#NZvsIND https://t.co/uXW6Vqvxca
— Cricbuzz (@cricbuzz) October 24, 2026
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉन जेकब्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत पाच गडी गमावून १८० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावल्यामुळे न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. मात्र त्यानंतर फिलिप्स आणि जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली.
न्यूझीलंडकडून फिलिप्सने ७० आणि जेकब्सने ५८ धावा केल्या. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. फिन ॲलनने १६, टिम सेफर्टने सात आणि डॅरिल मिचेलने सहा धावा केल्या. दरम्यान, मायकल ब्रेसवेल १० धावांवर नाबाद राहिला आणि मिचेल सँटनर चार धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





