Khalapur News : जमीन परत मिळविण्यासाठी शेतकऱ्याचा दावा
Khalapur News : औद्योगिकरणाची परवानगी घेऊन जमीन खरेदी करण्यात आली होती

खालापूर – औद्योगिकरणाच्या नावाखाली जमीन खरेदी करून तब्बल २० वर्षे उलटूनही त्या ठिकाणी कोणताही कारखाना उभारण्यात आला नसल्याचा आरोप कुंभिवली येथील शेतकरी रामचंद्र खोपकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी खालापूर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे.
कुंभिवली गावच्या हद्दीतील जुना सर्व्हे क्रमांक ९०/१ व नवीन सर्व्हे क्रमांक १०/१ तसेच जुना ९१/८ व नवीन सर्व्हे क्रमांक २/८ अशी सुमारे तीन एकर जमीन औद्योगिकरणासाठी जय हिंद प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या वतीने राजेश बी. शहा यांनी १२ डिसेंबर २००६ रोजी खरेदी केल्याचे खोपकर यांनी अर्जात म्हटले आहे.
औद्योगिकरणाची परवानगी घेऊन जमीन खरेदी करण्यात आली होती. जमीन खरेदी करताना मुलांना आणि नातेवाईकांना कारखान्यात रोजगार मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा खोपकर यांनी केला आहे. मात्र दोन दशके उलटूनही संबंधित जमिनीवर कोणताही कारखाना उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे जमीन पडीक राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा निर्धारित कालावधीत वापर न झाल्यास तरतुदीनुसार मूळ मालकाला जमीन परत मिळण्याचा अधिकार असल्याचा दावा खोपकर यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून जमीन मूळ मालकाला परत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित जमिनीची मोजणी करून कंपाउंड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही खोपकर यांनी केला आहे. या प्रकरणात स्थानिक राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही खोपकर यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदपत्रे व कायदेशीर तरतुदी तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.





