वडगाव मावळ – मावळ तालुका हा जरी खरीप भात पिकासाठी प्रसिद्ध असला तरीही तालुक्यात रब्बी पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या महिन्यात तालुक्यात रब्बी पिकांची लागवड जवळपास पूर्ण झाली होती. यानंतर आता ही सर्वच पिके जोमात आली आहेत. तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील रब्बी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर ही पिके बहरली असून यावर्षी रब्बी हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मान्सूनचा पाऊस उघडताच व भात कापणी झाल्यानंतर तालुक्यात रब्बी पिकाची पेरणी केली जाते. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा ह्या पिकांची प्राधान्याने लागवड करण्यात येत असते. यंदा परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबली. परिणामी रब्बी पिकाची पेरणी देखील लांबली. परंतू आता पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकेही चांगली जोमात आली आहेत. मावळात खरीप भात पिकाचे क्षेत्र हे जवळपास १३ हजार हेक्टर आहे, तर रब्बी पिकाचे क्षेत्र जवळपास पाच हजार हेक्टर इतके आहे. भात पिकाच्या कापणीनंतर ओल असलेल्या भात खाचरामध्येच हरभरा, मसूर, वाटाणा आदी पिके शेतकरी घेतात. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी मित्र हे तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांबाबत मार्गदर्शन करीत आहेत. “मावळ तालुक्यात काही ठिकाणी रब्बी ज्वारी ही हुरड्यावर आलेली आहे. थोड्याच दिवसात हरभरा पीकही चांगले मजबूतपणे येईल. तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणची रब्बी पिकांची स्थिती उत्तम आहे.” – अक्षय ढुमणे, कृषी सहाय्यक.