प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव मावळ येथील ऐतिहासिक पोटोबा महाराज मंदिराच्यामागे शनिवारी (१० जानेवारी) सकाळी एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुष मृत अवस्थेत मिळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वडगाव मावळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पोटोबा मंदिराचे पुजारी अशोक शंकर गुरव यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. १० जानेवारी रोजी सकाळी मंदिराच्या पाठीमागील भागात हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मयताच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट आणि वरून राखाडी रंगाचे जॅकेट घातलेले आहे. उजव्या हाताच्या बोटात स्टीलच्या अंगठ्या आहेत, फ्रेंच कट दाढी वाढलेली आहे आणि डाव्या हाताच्या पोटरीवर गोंदलेले आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ननावरे करत आहेत. या वर्णनाचा कोणताही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मयताबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास वडगाव मावळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.