Vadgaon Maval : कट्टर विरोधक एकाच मंचावर; खरचं मनोमिलन होणार का ?

वडगाव मावळ – मावळच्या राजकारणात पुन्हा एकदा सलोख्याचा खेळ रंगला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे दोघे अचानक एकाच मंचावर आले. तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी जमलेल्या जनसमुदायासमोर हे दृश्य पाहून हा विकासाचा सलोखा की निवडणुकीचा सौदा आहे, असा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कृषिमंत्री दत्ता भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांसारख्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. पण सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते या दोन विरोधी नेत्यांच्या एकाच मंचावरील वरवरच्या आपुलकीने. गेल्या काही वर्षांत एकमेकांविरुद्ध जाहीर टीका आणि टोलेबाजी करणारे हे दोघे नेते अचानक एकमेकांनर कौतुकाचा वर्षाव करताना दिसले.
सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे नेते असूनही भेगडे यांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता. नाते तुटले, कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आणि दोघांचे मतभेद सार्वजनिक झाले. आता मात्र माजी राज्यमंत्री भेगडे आमदार शेळके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजर राहून मंचावर म्हणतात की, तुम्ही एक हात पुढे केला, तर आम्ही दोन हात पुढे करू. आश्चर्य म्हणजे यावर शेळके प्रत्युत्तर देतात, मी हात पुढे केला आहे, आता तुम्ही ठरवा हात धरायचा का नाही. दोघांचे हे वाक्य ऐकून लोकांमध्ये शंका उमटल्या आहेत. ही विकासासाठीची एकता की राजकीय स्वार्थासाठीचा अभिनय आहे, अशी चर्चा सध्या बारीक आवाजात सुरू आहे.
अचानक कसे वाढले सख्य?
शेळके आणि भेगडे यांच्या या नव्या मैत्रीने मावळात राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे. हे दोघे खरोखर एकत्र येणार का, की फक्त निवडणुकीच्या आधी एकत्र दिसून कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणार आहेत, अशी चर्चा राजकीय गल्लीबोळात रंगली आहे.
या राजकीय द्वंद्वातील काही जखम अजूनही ताजी असताना, अचानक झालेली मैत्री अनेकांना संशयास्पद वाटते. आमदार शेळके म्हणतात, राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येऊ. परंतु मावळच्या मतदारांना गेल्या काही वर्षांत विकासाची फक्त भाषणे ऐकायला मिळाली, पण त्याचे प्रत्यक्ष परिणाम फारसे दिसले नाहीत, असे मतदारांचे म्हणणे आहे. अचानक हे सख्य कसे वाढले? कोणती राजकीय समीकरणे जुळविली जात आहेत? याबाबत आता तर्क लावले जात आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
या कार्यक्रमानंतर मावळातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कालपर्यंत जो विरोधक होता, आज तो सोबती झाला. मग आम्ही कोणासाठी लढायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत.
खरं तर मावळच्या जनतेला राजकीय खेळ आणि मंचावरच्या टाळ्यांपेक्षा आता खऱ्या विकासाची अपेक्षा आहे. पण दोघांच्या या अचानक सलोख्याने तो विकास पुन्हा राजकारणाच्या सावलीत गेला असल्याचे देखील बोलले जात आहे.





