Otur News : वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात; विद्यार्थ्यांना ११० पुस्तकांचे वाटप
Otur News : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Otur News : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. (Otur News)
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट, उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. छाया तांबे, ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे, मराठी विभागप्रमुख डॉ. वसंत गावडे, डॉ. ए. टी. पाडवी, डॉ. राजेश रसाळ, प्रमोद थोरवे आणि गणेश डुंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. (Otur News)
विद्यार्थ्यांना ११० पुस्तकांची भेट
वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी डॉ. कलाम यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच सकाळ, लोकमत, केसरी, लोकसत्ता, पुढारी, प्रभात, पुण्यनगरी, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स आणि इंडियन एक्स्प्रेस यांसह विविध वृत्तपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नरहर कुरुंदकर लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज : जीवन-रहस्य’ या पुस्तकाच्या ११० प्रती विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची प्रेरणा मिळाली. (Otur News)
वाचनातून विचारांची प्रगल्भता वाढते
‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. वसंत गावडे यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. वर्तमानपत्रातील बातम्या, अग्रलेख आणि पुस्तक परीक्षणे वाचण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी, असे त्यांनी सांगितले.
वाचनामुळे ज्ञान, विज्ञान, चिंतन, मनन आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित होतो. अभ्यासाबरोबरच कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, प्रवासवर्णन आणि लेखसंग्रह यांसारखे साहित्यही आवडीनुसार वाचावे. विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक वर्तमानपत्र नियमित वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. कलाम यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी
प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वाचनाची आवड याविषयी माहिती दिली. (Otur News)
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट म्हणाले की, वाचनामुळे शैक्षणिक समृद्धी वाढते, विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तीला योग्य दिशा मिळते. डॉ. कलाम यांनी शालेय जीवनात वृत्तपत्रे वितरित करण्याचे काम केले होते. त्यांच्या जीवनातील या अनुभवातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश हांडे यांनी केले, तर अर्णव बेनके याने आभार मानले. (Otur News)

