Pune : हवेतूनच विमानचा यूटर्न! लँड झाल्यावर ऋषिकेशला कळलं आपण बँकॅाक नव्हे तर ‘पुण्यात’; इनसाइट स्टोरीत ‘ही’ नवी माहिती समोर

पुणेः काल माध्यमांमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत याचे अपहरण झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, सह पुणे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मुलाची अपहरण नसून तो मित्रांनासोबत बँकोकाला गेल्याचे सांगितले.
मात्र, अपहरण झाल्याची तक्रार कशी काय दाखल करण्यात आली होती, असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विरोधकांकडून या प्रकरणावर यंत्रणेला विठीस धरण्याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर ऋषिकेश यांचे बंधू गिरीराज यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
मोहोळांची महत्वाची भूमिका
सावंत यांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ऋषिकेश याला परत आणण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यंत्रणेला सूचना केली. त्यानंतर या खाजगी विमानाच्या पायलटला परत फिरण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ऋषिकेश सावंत यांच्या खाजगी विमानाने हवेतूनच युटर्न घेत पुण्याच्या दिशेने फिरले. ज्यावेळी विमान पुण्यात लँड झाला त्यावेळी आपण बँकॅाकला नाही तर पुण्यात असल्याचे ऋषिकेश सावंत याला समजले.
…म्हणून केली अपहरणाची तक्रार दाखल
काल साडे तीन वाजण्याच्या सुमारास लहान भावाचा मेसेज आला की, तो दोन दिवसांसाठी बाहेर चालला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी तो दुबईला गेला होता. सहा-सात दिवसांपूर्वीच तो आला. आणि पुन्हा अचानक फोन बंद करून तो निघून गेला. जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिली असल्याची प्रतिक्रिया गिरीराज सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती. नंतर आम्हाला कळालं की, तो बँकॉकला बिझनेसच्या कामानिमित्ताने गेला होता, असे देखील गिरीराज यावेळी बोलताना म्हणाले.





