Neelam Gorhe : डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या धावत्या मोटारीचे टायर अचानक फुटले

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मोटारीचे दोन टायर शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी परिसरात अचानक फुटले. धाराशिव येथील शासकीय मोटार चालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टळला. सुदैवाने या घटनेत डाॅ. गोऱ्हे यांच्यासह चालकाला दुखापत झाली नाही.
डाॅ. गाेऱ्हे या सोलापूरकडून शुक्रवारी पुण्याकडे निघाल्या होत्या. पावसामुळे टेंभुणी बाह्यवळण मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत शासकीय मोटारीचे टायर अचानक शुक्रवारी दुपारी फुटले. मोटार चालकाने प्रसंगावधान राखून नियंत्रण मिळविल्याने गंभीर अपघात टळला. डाॅ. गोऱ्हे यांच्या मोटारीचा अपघात झाल्यानंतर याच परिसरात आणखी दोन वाहनांचे टायर फुटले.
या घटनेची गंभीर दखल घेऊन डाॅ. गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना टेंभुर्णी बाह्यवळण मार्गावरील खड्डे त्वरीत बुजविण्याचे आदेश दिले. डाॅ. गोऱ्हे यांच्यासह चालकाला अपघातात दुखापत झाली नसल्याचे डाॅ. गोऱ्हे यांचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी कळविले आहे.





