हेलिकॉप्टर दुर्घटना ! अमेरिकेत हडसन नदीत कोसळले हेलिकॉप्टर ; ३ चिमुरड्यांसह ६ जणांचा मृत्यू

USA Helicopter Crash । न्यूयॉर्क शहरातील हडसन नदीत एक पर्यटक हेलिकॉप्टर कोसळल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये तीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती एक इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी, “मृत्यूमुखी पडलेले सर्वजण स्पेनमधील एकाच कुटुंबातील होते, आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरचा पायलटही होता.” असे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, अपघातानंतर दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी मृतांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमध्ये सीमेन्स स्पेनचे अध्यक्ष आणि सीईओ ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि त्यांची तीन मुले असल्याचा अंदाज आहे. महापौर अॅडम्स यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “सर्व सहा जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.”असे म्हटले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया USA Helicopter Crash ।
या अपघातावर शोक व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, “हडसन नदीत झालेला हा हेलिकॉप्टर अपघात अत्यंत भयावह आहे. पायलट, दोन प्रौढ आणि तीन मुले असे सहा जण आता आपल्यात नाहीत. या अपघाताचा व्हिडिओ पाहणे धक्कादायक आहे.” असे म्हटले. ट्रम्प यांनी सोशल मीडिया मंचावर, “पीडितांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना देव शक्ती देवो. वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांचे पथक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हा अपघात कसा आणि का घडला, याचा लवकरच खुलासा होईल.” म्हटले.
अपघात कसा घडला? USA Helicopter Crash ।
न्यूयॉर्क पोलिस आयुक्त जेसिका टिश यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बेल २०६ हेलिकॉप्टर न्यू यॉर्क हेलिकॉप्टर टूर्स कंपनीचे होते. दुपारी ३ वाजता शहरातील एका हेलिकॉप्टर पॅडवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीच्या उत्तर दिशेने निघाले. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ पोहोचल्यावर हेलिकॉप्टर दक्षिणेकडे वळले. त्यानंतर काही मिनिटांतच, दुपारी ३:१५ च्या सुमारास, लोअर मॅनहॅटनजवळ हेलिकॉप्टर उलटले आणि नदीत कोसळले असे टिश यांनी सांगितले.





