‘२४ तासांत निर्णय बदलला नाही तर आम्ही ५०% कर लादू’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी

USA-China on Tariff । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरीफच्या मुद्द्यावरून चीनला थेट इशारा दिला आहे. जर त्यांनी अमेरिकन वस्तूंवर लावलेला ३४ टक्के कर रद्द केला नाही तर अमेरिका चीनवर ५० टक्के कर लादेल.” असे ट्रम्प सरकारकडून म्हटले आहे. ट्रम्प यांनी चीनला हा निर्णय घेण्यासाठी २४ तासाचा वेळ दिला आहे.
ट्रम्प यांनी चीनला इशारा देताना,”जर चीनने आपले कर मागे घेतले नाहीत तर अमेरिका केवळ मोठे कर लादणार नाही तर चीनसोबतच्या सर्व वाटाघाटी देखील थांबवेल “अशी सरळ धमकी दिली आहे. खरंतर, अमेरिकेने काही चिनी वस्तूंवर शुल्क लादले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादले. यामुळे ट्रम्प संतापले आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ‘हे’ सांगितलं USA-China on Tariff ।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्रम्प म्हणाले, “चीनने आधीच खूप जास्त कर लादले आहेत. अशा परिस्थितीत, अधिक कर लादणे योग्य नाही. जर कोणत्याही देशाने अमेरिकेवर अधिक कर लादून प्रतिसाद दिला तर त्यांना लगेचच आणखी मोठ्या करांना सामोरे जावे लागेल.” असे त्यांनी म्हटले.
‘चीनने आपले शुल्क मागे घ्यावे’
जर चीनने ८ एप्रिल २०२५ पर्यंत व्यापारातील अनियमितता आणि ३४% कर वाढ मागे घेतली नाही, तर अमेरिका ९ एप्रिलपासून चीनवर अतिरिक्त ५०% कर लादेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासोबतच, चीनसोबत सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि बैठका देखील थांबवल्या जातील.
आपल्या टॅरिफ धोरणाचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, जगातील अनेक देश अमेरिकेशी वाटाघाटी करत आहेत, परंतु आता वाटाघाटीसाठी योग्य पद्धत निश्चित करण्यात आली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेसोबतच्या व्यापारात अनेक देशांनी अन्याय्य वर्तन केले आहे. आता हा दृष्टिकोन बदलावा लागेल, विशेषतः चीनला त्याचे वर्तन सुधारावे लागेल.
चीनने केले होते गंभीर आरोप USA-China on Tariff ।
चीनने सोमवारी अमेरिकेवर शुल्क लादून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, अमेरिका जे करत आहे ते आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध आहे. हा एकतर्फी निर्णय म्हणजे त्यांच्या उद्योगांना वाचवण्याचा आणि आर्थिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. लिन यांनी असेही म्हटले आहे की अमेरिकेच्या या नवीन करांचा जगभरातील वस्तूंच्या उत्पादन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे.





