डोनाल्ड ट्रम्पचा ‘गेम प्लॅन’ ; चीनवर १२५% कर तर ७५ देशांना ९० दिवसांची ‘सूट’

US Tariff On China । जगातील दोन सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आणि चीन यांच्यात मोठे व्यापार युद्ध सुरू आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या निर्णयानंतर चीननेही आक्रमक भूमिका स्वीकारली आणि अमेरिकेवर ८४ टक्के प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी एक चाल केली आहे ज्यामध्ये चीन अडकत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने आता चीनमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर १२५ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, तर इतर ७५ देशांवर लादलेला कर पुढील ९० दिवसांसाठी थांबवण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर चीनविरुद्ध १२५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणानुसार, जर कोणताही देश अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लादतो, तर अमेरिका देखील त्याच प्रमाणात टॅरिफ लादेल. तथापि, आता याचा सर्वात जास्त फटका चीनला सहन करावा लागत आहे.
अमेरिकेला लुटण्याची वेळ आता संपली US Tariff On China ।
ट्रम्प यांनी चीनवर अमेरिकन बाजारपेठेचे शोषण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आता अशी वेळ आली आहे जेव्हा चीनला हे समजून घ्यावे लागेल की अमेरिकेला लुटण्याचा काळ संपला आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी ७५ देशांवर परस्पर शुल्क लादले होते, परंतु आता त्यांनी ९० दिवसांसाठी शुल्क स्थगित केले आहे. अमेरिकेने हे केले कारण या देशांनी कोणतीही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली नाही आणि जकातीच्या मुद्द्यावर अमेरिकेशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली. अमेरिकेने दावा केला होता की भारतासह जगातील ५० देश त्यांच्याशी टॅरिफबाबत चर्चा करू इच्छितात.
अमेरिका-चीन संघर्ष US Tariff On China ।
ट्रम्प यांच्या धोरणावरून हे स्पष्ट होते की अमेरिकेचा मुख्य विरोधक चीन आहे. एकीकडे चीन स्वतःला जागतिक नेता म्हणून सादर करत असताना, दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेने मोठ्या प्रमाणात कर लादल्यामुळे चीनकडून स्वस्त वस्तूंचा पुरवठा थांबेल. चीनच्या निर्यात अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे.





