Shehbaz Sharif : पाकिस्तानवरील अमेरिकेचे निर्बंध अन्यायकारक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा थयथयाट

इस्लामाबाद – अमेरिकेने पाकिस्तानच्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांशी संबंधित संस्थांवर घातलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी थयथयाट केला आहे. हे निर्बंध अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या चार संस्थांवर निर्बंध घातले आहेत.
त्यामध्ये पाकिस्तानच्या नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स या सरकारी एरोस्पेस डिफेन्स एजन्सीचाही समावेश आहे. याशिवाय अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, एफिलिएट्स इंटरनॅशनल आणि रॉकसाइड एंटरप्राइझ या तीन इतर संस्थांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
तिन्ही संस्था कराचीमधील असून एनडीसी इस्लामाबादेत कार्यरत आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमामध्ये योगदान देण्याच्या आरोपावरून हे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांचे कोणतेही समर्थन केले जाऊ शकत नाही, असे शरीफ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना सांगितले.
आण्विक प्रणाली आक्रमक बनवण्याचा पाकिस्तानचा कोणताही हेतू नाही. ही प्रणाली १०० टक्के पाकिस्तानच्या संरक्षणासाठी आहे. पाकिस्तानचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम स्वतःचा बचाव करण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.
मानवी हक्क, दहशतवाद, अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित मुद्द्यांमुळे अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहेत.





