कोरोनावरून अमेरिकेचा चीनला धक्का; विषाणूच्या उत्पत्तीबाबत होणार तपास

वॉशिंग्टन – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक प्रगत देशांच्या आरोग्य व्यवस्था कोरोनामुळे कोलमडून पडल्या आहेत. कोरोनाचा उगम चीन येथील वुहान शहरामध्ये झाला असून हा विषाणू नेमका आला कुठून? याबाबतचे समाधानकारक उत्तर चीनकडून अद्याप देण्यात आलं नसल्यानं जगभरातील अनेक देश चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. अशातच आता अमेरिकेने कोरोना विषाणूची उत्पत्ती चिनी प्रयोग शाळेमध्ये झाली आहे का? याबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘चीनच्या वुहान येथील एका व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीतून करोनाचा विषाणू बाहेर पडल्याचे जे वृत्त प्रसारित झाले आहे त्याची आम्ही शहानिशा करीत आहोत.’ अशी माहिती दिली. ट्रम्प यांनी यावेळी बोलताना अमेरिकेतर्फे वुहानमधील त्या लॅबला दिले जाणारे अनुदान आता बंद केले जात आहे अशी घोषणाही केली.
तत्पूर्वी, चीनतर्फे सुरुवातीला विशिष्ट प्रकारच्या वटवाघळापासून कोरोनाची लागण मानवाला झाली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने केलेल्या तपासात चीनने सांगितलेल्या वटवाघळा वुहानमध्ये आढळतच नसल्याचं समोर आलंय. या माहीतेमुळे निश्चितच संशयाला जागा निर्माण झाली असून याचा छडा लवकरात लवकर लागून सत्य जगासमोर यावे अशीच इच्छा व्यक्त केली जात आहे.





