US: मेक्सिकोच्या आखाताचे नाव आता ‘अमेरिकेचे आखात’; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन – मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेचे आखात म्हणून संबोधण्याच्या घोषणापत्रावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी स्वाक्षरी केली. एवढेच नव्हे तर ९ फेब्रुवारी हा दिवस अमेरिकेच्या आखाताचे नामकरण साजरा करण्याचा दिवस म्हणून देखील जाहीर करण्यात आले आहे. दिनांक २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेला हा १४ हजार १७२ वा कार्यकारी आदेश आहे.
या आदेशाद्वारे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कॉन्टिनेंटल शेल्फ क्षेत्राचे नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा एक भाग म्हणून, गृह सचिवांना टेक्सास, लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा आणि फ्लोरिडाने वेढलेल्या क्षेत्राचे नाव बदलण्यासाठी आणि मेक्सिको आणि क्युबाच्या सागरी सीमेपर्यंत विस्तार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वी मेक्सिकोचे आखात म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र आपल्या एकेकाळी आपल्या वाढणाऱ्या देशासाठी दीर्घकाळापासून अमेरिकेचा एक अविभाज्य भाग राहिले आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या आदेशाच्या स्पष्टिकरणात म्हटले आहे. मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी या भागाचा दौरा केला.
मी सार्वजनिक अधिकाऱ्यांना आणि अमेरिकेतील सर्व लोकांना योग्य कार्यक्रम, समारंभ आणि उपक्रमांसह हा दिवस साजरा करण्याचे आवाहन करतो, असेही ट्रम्प यांनी आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे.
कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य करण्याबाबत गंभीर –
कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अलिकडेच अमेरिकेवर जशास तसे धोरणानुसार आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला होता. त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता अमेरिकेचे ५१ राज्य कॅनडा व्हावे, या आपल्या इच्छेबाबत आपण गंभीर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. कॅनडावर आपण दरवर्षी २०० अब्ज डॉलर्स गमावतो. आणि मी ते होऊ देणार नाही, आपण दरवर्षी २०० अब्ज डॉलर्स का देत आहोत ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.





