US Open 2024 (Mixed Doubles) : बोपण्णा-सुत्जियादी जोडीला Semi-final मध्ये पराभवाचा धक्का…

US Open 2024 Mixed Doubles (Rohan Bopanna-Aldila Sutjiadi) :- भारताचा 44 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार 29 वर्षीय अल्दिला सुत्जियादी यांना सध्या सुरू असलेल्या यूएस ओपन 2024 टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टेलर टाउनसेंड आणि डोनाल्ड यंग या अमेरिकन जोडीकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यासह बोपण्णा-सुत्जियादी जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मंगळवारी लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडो-इंडोनेशियन जोडीचा अमेरिकन जोडीने 6-3, 6-4 असा पराभव केला. हा सामना जवळपास 55 मिनिटे चालला. अंतिम लढतीत टाऊनसेंड-यंगचा सामना इटलीच्या सारा एरानी आणि अँड्रिया वावसोरी यांच्याशी होईल.
असा रंगला सामना…
बोपण्णा-सुत्जियादी यांच्याविरुद्ध अमेरिकेने जोरदार सुरुवात केली आणि पहिल्या सेटमधील पहिले तीन गेम जिंकले. त्यानंतर इंडो-इंडोनेशियन जोडीने पुनरागमन करत सेट 3-3 असा बरोबरीत सोडवला. मात्र, यानंतर अमेरिकन जोडीने बोपण्णा आणि त्याच्या जोडीदाराला कोणतीही संधी दिली नाही आणि पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसरा सेट बरोबरीत सुरू झाला; मात्र, पाचव्या गेममध्ये इंडो-इंडोनेशियाची जोडी डगमगली आणि त्यामुळे महत्त्वपूर्ण ब्रेक पॉइंट गमवावा लागला. यानंतर अमेरिकन जोडीने आपल्या सर्व सर्विस गेम कायम ठेवत हा सेट 6-4 असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त….
यासह बोपण्णा यूएस ओपन 2024 मधून बाहेर पडल्याने, वर्षातील अंतिम ग्रँड स्लॅममधील भारताचे प्रतिनिधित्व संपले आहे. याआधी यूएस ओपनच्या पुरुष दुहेरीत बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांना प्री-क्वार्टर फायनलमध्ये आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ या अर्जेंटिनाच्या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय टेनिसपटू एन श्रीराम बालाजी आणि युकी भांबरी यांनाही यूएस ओपनमध्ये आपापल्या दुहेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, एकेरीत सुमित नागल हा एकमेव भारतीय होता, ज्याचे पहिल्याच फेरीच्या पराभवानंतरच आव्हान संपुष्टात आले होते.





