US Open 2021 | आर्यना सबालेंका तिसऱ्या फेरीत

न्यूयॉर्क -अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजयी वाटचाल कायम राखताना महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासनेही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
यंदाच्या स्पर्धेत मानांकित खेळाडूंपैकी अनेकांनी माघार घेतल्यामुळे नवोदितांना जेतेपदाची संधी मिळाली आहे. सबालेंकाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या तमारा झिदानसेकचा 6-3, 6-1 असा सहद पराभव केला. अन्य लढतीत नवोदित मात्र, सातत्याने चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या डॅनिली कॉलीनने स्लोव्हाकियाच्या काजा जुव्हानवर 6-4, 6-2 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली.
पुरुष एकेरीच्या सामन्यात त्सित्सिपासने फ्रान्सच्या आद्रीयन मन्नारीनोचा 6-3, 6-4, 7-6, 6-0 असा पराभव केला व तिसरी फेरी गाठली. अर्जेंटिनाच्या डीएगो श्वार्त्झमनने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अँडरसनवर 7-6, 6-3, 6-4 अशी सहज मात केली.
अमेरिकेच्या फ्रान्सिस तैफुनेही तिसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या गोइडो पेला याच्यावर 6-1, 6-2, 7-5 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. यंदाच्या स्पर्धेत तैफुने प्रथमच चमकदार खेळ केला आहे. यापूर्वीच्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत त्याला फारसे यश मिळालेले नाही. या स्पर्धेत यश मिळवत यंदाच्या मोसमाची समाधानकारक अखेर करण्यासाठी तो सज्ज बनला आहे.





