US Mass Shooting : अमेरिकेत पुन्हा स्वैर गोळीबार..! एक ठार, तर 2 डझन लोक जखमी….

ओक्रोन, (अमेरिका) – अमेरिकेतील ओहिओ प्रांतात झालेल्या स्वैर गोळीबाराच्या एका घटनेमध्ये किमान एकजण ठार झाला आणि अन्य 2 डझन लोक जखमी झाले आहेत. अक्रोन शहरात मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटे गोळीबार झाल्याची नोंद झाली. तिथे गोळीबारात अनेक जखमी झाले.
स्थानिक रुग्णालयांनी लगेचच आपत्कालीन व्यवस्थेमार्फत जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली, असे पोलिसांनी सांगितले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असून इतरांना झालेली इजा गंभीर नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू असून या संदर्भातली महत्वाची माहीती देण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे.
या परिसरात रस्त्यावर पार्टी सुरू होती. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. पांढरा टी-शर्ट घातलेले शेकडो लोक आनंद लुटत होते आणि महिला वाहनांच्या वर उभ्या राहून नाचत होत्या, असे एका साक्षीदाराने सांगितले. घटनास्थळी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्यांच्या शेकडो रिकाम्या पुंगळ्या आणि एक बंदूक सापडली आहे. हा गोळीबार नक्की कोणी आणि का केला, हे समजू शकलेले नाही.


