तालिबानी नेत्यांवरील बक्षिस अमेरिकेने हटवले, सिराजुद्दीन हक्कानीसह ३ नेत्यांना दिलासा

काबूल – अमेरिकेने तालिबानच्या ३ वरिष्ठ नेत्यांवर लावलेले बक्षिस मागे घेतले आहे. यामध्ये अफगामिस्तानमधील गृहमंत्री आणि हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीचाही समावेश आहे. त्याच्यावर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले होते. ते आता मागे घेतले गेले आहे, असे काबूलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील पुर्वीच्या पाश्चात्य देशांच्या पाठिंब्यावरील सरकारवर घातक हल्ले याच हक्कानी नेटवर्ककडून केले गेले होते. सिराजुद्दीन हक्कानीने जानेवारी २००८ मध्ये काबूलमधील सेरेना हॉटेलवरच्या हल्ल्याचा कट केला होता. या हल्ल्यात अमरिकेचे नागरिक थोर डेव्हिड हेस्ला यांच्यासह ६ जण ठार झाले होते. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या बक्षिस लावलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून सिराजुद्दीन हक्कानीचे नाव काढून टाकण्यात आले आहे. मात्र एफबीआयच्या संकेतस्थळावर वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अजूनही त्याचे नाव आहे.
सिराजुद्दीन हक्कानीसह अब्दुल अझिझ हक्कानी आणि याह्या हक्कानी यांच्यावरील बक्षिस अमेरिकेच्या सरकारने मागे घेतले आहे, असे अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचा प्रवक्ता अब्दुल मतीन कानी याने सांगितले. या तिघांमध्ये दोघे सख्खे भाऊ आणि एक त्यांचा मामेभाऊ असल्याचे कानी म्हणाला.
अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला तेंव्हा हक्कानी नेटवर्क या घातक दहशतवादी संघटनेचा उदय झाला होता. या गटाने रस्त्याच्या कडेला बॉम्ब पेरणे, आत्मघातकी बॉम्बस्फोट करणे आणि अन्य हल्ले केले होते. भारतीय आणि अमेरिकेच्या दूतावासावर, अफगाण अध्यक्षांच्या कार्यालयावर आणि अन्य महत्वाच्या ठिकाणीही या गटाने हल्ले केले होते.





