न्यूयॉर्क – पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यावर निर्बंध घालण्याची मागणी करणारे विधेयक अमेरिकेतल्या खासदारांनी संसदेत सादर केले आहे. राजकीय विरोधकांचा चुकीच्या पद्धतीने छळ करणे आणि तुरुंगवासात टाकण्याबद्दल जनरल मुनीर यांच्यावर निर्बंध घातले जावेत. तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अन्य विरोधकांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक ऍक्ट नावाचे हे विधेयक रिपब्लिकन पक्षाचे साऊथ कॅरोलिनामधील लोकप्रतिनिधी जो विल्सन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे कॅलिफोर्नियातले लोकप्रतिनिधी जिमी पॅनेटा यांनी सोमवारी मांडले आहे. दोन पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या या विधेयकात जनरल मुनीर यांच्यावर जाणीवपूर्वक आणि चुकीच्या पद्धततीने राजकीय विरोधकांचा छळ केल्याचा आणि विरोधकांना तुरुंगात टाकण्याचा आरोप केला गेला आहे. ग्लोबल मॅग्नित्स्की ह्युमन राईट्स अकाऊंटेबिलीटी ऍक्ट अंतर्गत लष्कर प्रमुखांवर १८० दिवसांच्या आत निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी यात केली गेली आहे. या निर्बंधांनुसार दोषी व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश बंदी केली जाते आणि अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरवले जाते. इम्रान खान यांच्यावर २०२२ मध्ये अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आल्यापासून खान यांच्यावर डझनभर खटले दाखल आहेत. त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या ते रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणावा, अशी विनंती आपण अध्यक्ष ट्रम्प यांना केली असल्याचेही विल्सन यांनी माध्यमांना सांगितले.