US-Israel war against Iran: अमेरिका-इराण युद्धात एक आठवड्यात काय घडलं? कोण जिंकतंय? संघर्ष किती काळ चालणार? जाणून घ्या सर्वकाही
US-Israel war against Iran: ट्रम्प यांनी सुरुवातीला दोन-तीन दिवसांत युद्ध संपेल असे सांगितले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी हा अंदाज बदलत चार आठवडे लागतील असे म्हटले. व्हाईट हाऊसचा अधिकृत अंदाज चार ते सहा आठवड्यांचा आहे.

US-Israel war against Iran: अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून इराणवर सुरू केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात मोठे युद्ध पेटले आहे. एका आठवड्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले, हजारो नागरिक जखमी-मृत झाले आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे जागतिक तेलाच्या किमती कडाडल्या. युद्ध थांबण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.
सात दिवसांत काय घडले? US-Israel war against Iran
२८ फेब्रुवारी — पहिला दिवस
अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ तर इस्रायलने ‘ऑपरेशन रोरिंग लायन’ या नावाने इराणवर हल्ले सुरू केले. १०० हून अधिक लढाऊ विमाने आणि जड क्षेपणास्त्रांचा वापर करत सरकारी इमारती आणि सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. याच हल्ल्यात खामेनेई ठार झाले. मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर क्षेपणास्त्र हल्ल्यात १६५ मुली मृत्युमुखी पडल्या. जवाबी कारवाईत इराणने इस्रायल, आखाती देशांतील अमेरिकी तळ आणि दुबईच्या पर्यटन क्षेत्रांवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली.
१ मार्च — दुसरा दिवस
अमेरिकेने इराणच्या ९ युद्धनौका बुडविल्याचा आणि नौदल मुख्यालयासह आयआरजीसी मुख्यालय अंशतः उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. इराणने कुवेतमधील अमेरिकी तळावर ड्रोन हल्ला केला, ज्यात ६ अमेरिकी सैनिक मारले गेले. इस्रायलमधील बेत शेमेश शहरावर इराणी क्षेपणास्त्र पडून ९ जण ठार झाले.
२ मार्च — तिसरा दिवस
लेबनॉनमधून हेझबोल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर हे युद्ध लेबनॉनपर्यंत विस्तारले. इस्रायलने बेरूतवर हवाई हल्ले केले, ज्यात ३१ जण मरण पावले. इराणने सौदी अरेबियाच्या रास तनुरा रिफायनरीवर हल्ला केला. कुवेतमध्ये एका फ्रेंडली फायर घटनेत अमेरिकेची तीन एफ-१५ विमाने पडली, जरी पायलट सुखरूप सुटले. ईरानने मात्र हे विमाने आपण पाडल्याचा दावा केला.
३ मार्च — चौथा दिवस
अमेरिकेने बंकर-बस्टर बॉम्ब वाहणारे बी-२ विमाने तैनात केली. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. जागतिक तेल पुरवठ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. रियाध आणि कुवेतमधील अमेरिकी दूतावासांवर ड्रोन हल्ले झाल्याने ते तात्पुरते बंद करावे लागले. दोहा, दुबई, अबुधाबी, बहरीन आणि कुवेतमध्ये अनेक इराणी क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली.
४ मार्च — पाचवा दिवस
तुर्कियेकडे झेपावलेले इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाटोच्या हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केले. अमेरिकी पाणबुडीने हिंद महासागरात इराणचे युद्धनौका आयआरआयएस देना टॉर्पेडोने बुडविले. हे जहाज भारतातील नौदल सरावावरून परतत होते आणि श्रीलंकेच्या गॉलजवळ होते. या हल्ल्यात ८७ इराणी नौसैनिक मारले गेले. भारतीय नौदलाने बचाव कार्यात मदत केल्याचे नंतर जाहीर केले.
५ मार्च — सहावा दिवस
पहिल्यांदाच हवाई लढाई झाली. इस्रायली एफ-३५ने तेहरानवर इराणचे सुखोई-३५ पाडल्याचा दावा केला. युद्धनौका बुडविल्याचा बदला म्हणून इराणने फारस आखातात अमेरिकी तेल टँकरवर हल्ला केला. अझरबैजानच्या नखचिवान विमानतळावर ड्रोन हल्ल्यात ४ जखमी झाले, मात्र इराणने यातील सहभाग नाकारला.
६ मार्च — सातवा दिवस
पश्चिम आशियाभर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच राहिले. इस्रायलने इराण आणि लेबनॉनमध्ये हल्ल्यांची नवी मोठी लाट जाहीर केली. इराणने थेट तेल अवीवच्या मध्यभागी ड्रोन व क्षेपणास्त्रे डागली. दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नसल्याचे यातून स्पष्ट झाले.
आठव्या दिवशी युद्धाची स्थिती काय? US-Israel war against Iran
अमेरिकेने २८ फेब्रुवारीपासून इराणच्या ३,००० हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले असून ४३ इराणी युद्धनौका नष्ट केल्याचा दावा आहे. शनिवारी इस्रायलने तेहरान आणि लेबनॉनमध्ये बॉम्बहल्ल्यांची नवी लाट सुरू केली. इराण तेल अवीवकडे ड्रोन व क्षेपणास्त्रे डागत आहे. हा संघर्ष आता इस्रायलसह १४ देशांपर्यंत पोहोचला आहे. लेबनॉनच्या बेका व्हॅलीत हेझबोल्लाह लढवय्ये इस्रायली सैनिकांशी थेट झुंजत आहेत. इराक, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमध्येही हल्ले झाले आहेत.
युद्धाची मानवी किंमत –
इराणमध्ये आतापर्यंत किमान १,३३२ नागरिक ठार झाले आहेत. लेबनॉनमध्ये २०० हून अधिक, इस्रायलमध्ये ११ आणि अमेरिकेचे ६ सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, पश्चिम आशियात सुमारे ३,३०,००० लोक विस्थापित झाले आहेत. जगभरातील विमान कंपन्यांनी ११,००० हून अधिक उड्डाणे रद्द केली असून अनेक प्रवासी अडकले आहेत. कच्च्या तेलाचे दर १०% हून अधिक वाढून ९१ डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत.
युद्धावर किती खर्च होतोय? US-Israel war against Iran
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) च्या अंदाजानुसार, ऑपरेशन एपिक फ्युरीच्या पहिल्या १०० तासांतच सुमारे ३.७ अब्ज डॉलर खर्च झाले. म्हणजेच दररोज सुमारे ८९.१ कोटी डॉलरचा भार पडत आहे. विशेष म्हणजे, या खर्चासाठी आधीच कोणतेही बजेट ठरविलेले नव्हते. शस्त्रांची वाढती मागणी पाहता ट्रम्प यांनी संरक्षण उत्पादक कंपन्यांना शस्त्रनिर्मिती चौपट करण्याचे निर्देश दिले आहेत.
होर्मुझ सामुद्रधुणी बंद पडल्यामुळे कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक वायूच्याही किमती वाढल्या आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी पुन्हा वाढविली आहे. मात्र पश्चिम आशियातून येणाऱ्या गॅसच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढविण्यात आल्या असून दोन सिलेंडर मिळण्यातील किमान अंतर १५ दिवसांवरून २१ दिवस करण्यात आले आहे.
कोण जिंकतेय?
सध्या कोणताही स्पष्ट विजेता नाही. इस्रायलचा दावा आहे की त्याने इराणच्या ८०% हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्या आहेत आणि इराणच्या हवाई क्षेत्रावर जवळपास संपूर्ण वर्चस्व मिळवले आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ९०% आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये ८३% घट झाली आहे.
दुसरीकडे इराणने खामेनेई आणि बहुतांश राजकीय नेतृत्व गमावूनही युद्ध सुरू ठेवले आहे. शाहेद-१३६ सारख्या कमी किमतीच्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करत इस्रायलच्या हवाई संरक्षण नेटवर्कला भेदण्याची इराणची रणनीती आहे. पश्चिम आशियात अनेक आघाड्यांवर अमेरिका आणि इस्रायलला गुंतवत ठेवण्यात इराण यशस्वी ठरत आहे, ज्यामुळे युद्धाचा खर्च प्रचंड वाढत आहे.
हे युद्ध किती काळ चालणार?
ट्रम्प यांनी सुरुवातीला दोन-तीन दिवसांत युद्ध संपेल असे सांगितले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी हा अंदाज बदलत चार आठवडे लागतील असे म्हटले. व्हाईट हाऊसचा अधिकृत अंदाज चार ते सहा आठवड्यांचा आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी कोणतीही निश्चित वेळमर्यादा सांगण्यास नकार दिला आहे. पेंटागनच्या एका अंतर्गत अहवालानुसार हा संघर्ष सप्टेंबरपर्यंत चालू शकतो. इराणचे म्हणणे आहे की समोरून हल्ले थांबले तर ते युद्ध थांबवण्यास तयार आहेत. मात्र ट्रम्प यांनी ‘बिनशर्त शरणागती’शिवाय कोणतीही तडजोड नाकारल्याने मुत्सद्देगिरीची शक्यता अत्यंत धूसर दिसत आहे.





